रितुपर्णोबद्दल लिहीत होते तेव्हाच माझ्या डोक्यात हा विषय घोळत होता.
शरीरात लिंग इवल्युशा जागेत असतं. सर्वसाधारणपणे माणसाचं वजन साठ किलो
धरलं- तर त्यात लिंगाचं वजन कितीसं असेल? ते सोडून उरलेल्या बाकी शरीराचं-
माणूसपणाचं काय? लिंगभेद आणि चर्चा बास झाल्या आता.
अजूनही 'गे' व्यक्ती
टवाळीचा विषय असतात. अॅवॉर्ड नाईटसारख्या विविध गुणदर्शनाच्या
कार्यक्रमांमध्ये एखादं अतिरंजित 'गे' पात्रं पाहिलं की मला जरासुद्धा हसू
येत नाही. बायकांच्या मठ्ठ सौंदर्याबद्दलचे आणि 'गे' असण्याचे थिल्लर विनोद
आता थांबवायलाच हवेत. अपंगत्वाचे थांबवले ना आपण? मला खरं म्हणजे खूप र्वष
'गे' ही संकल्पनाच कळली नव्हती. 'गे' म्हणजे काय? शरीर वेगळं असतं का?
ठेवण वेगळी असते का? तृतीयपंथी म्हणजे 'गे' नव्हेत का? सिग्नलला उभं राहून
टाळ्या वाजवत पैसे मागणाऱ्या हिजडय़ांविषयी आपल्याला तिटकारा वाटतो. आपल्या
वेगळेपणाचं बीभत्स प्रदर्शन आणि त्यातली आक्रमकता नको वाटते. पण या
वेगळेपणामुळे स्वत:ला अपूर्ण न मानता कित्येकजण आपल्या बाय डिफॉल्ट-
निसर्गानं देऊ केलेल्या प्राक्तनाशी दिलजमाई करतात की.. ते जागरूक नागरिक
असतात. शांतपणे जगत असतात.
समलिंगी माणूसच कसा आवडू शकतो एखाद्याला
किंवा एखादीला? कारण फक्त पुरुषच समलिंगी नात्यात असतात असं नाही. आता
स्त्रियांमध्येही आपलं समलिंगी नातं मान्य करण्याचं धाडस यायला लागलंय.
पहिल्यांदा जेव्हा माझ्या एका सुप्रसिद्ध मैत्रिणीनी माझ्यावर लाइन मारली,
तेव्हा माझ्यापर्यंत त्या लायनीतली मेख पोचलीच नव्हती. माझं कौतुक करत होती
..म्हणून मला ती खूप चांगली वाटली होती. मग काही दिवसांनी तिनी जरा जास्त
थेटपणे सुचवल्यावर माझ्या पायाखालची वाळूच सरकली. पाप ऐकल्यासारखं वाटलं.
तू मला असं काही विचारूच कशी शकतेस- असं वाटेपर्यंत माझा दुखावलेपणा उफाळून
आला. मैत्रिणीचा रागराग आला. पण तो विषय त्या क्षणी कायमचा संपला. परत
कधीही त्या गोष्टीची आठवण होणार नाही- अशी सभ्यता दाखवली मैत्रिणीनं-
आजतागायत.
कालांतरानी कळत गेलं की, हे माणसांचे चॉइस असतात. एकतर
शारीरिक भिन्नतेतून उपजतच आलेले किंवा दुसरं म्हणजे निर्णय स्वातंत्र्याचा
हक्क म्हणून स्वेच्छेनी निवडलेले. या निवडीला 'असले प्रकार' म्हणणं मी
जाणीवपूर्वक टाळते, कारण एकांतात, बंद दाराआड, इतरांना उपद्रव न देता-
माणसं जे काही करतात तो त्यांचा हक्क आहे. आपसातला प्रश्न आहे. स्वानंदाचा
भाग आहे. मी 'अग्निवर्षां' सिनेमाच्या शूटिंगसाठी हंपीमध्ये होते. तिथे
उत्खननात सापडलेल्या स्थापत्य कलांमध्ये, भग्न राजवाडय़ांच्या अवशेषांमध्ये
पूर्वापार असलेले अनेक सुराग सापडतात. तिथला गाइड त्या वास्तूंची माहिती
देताना स्वच्छपणे सांगत होता.. राजे लढाईसाठी मोहिमेवर गेल्यानंतर राण्या
एकटय़ा असल्या की हिजडे त्यांना सोबत करत, रक्षणही करत. जनाना स्नानासाठी
गुलाब पाकळ्यांनी आच्छादलेल्या तलावात उतरला की त्यांना अत्तर, चंदन, तेल
लावण्यासाठी/ स्तुतीसाठी काही समलिंगी आवड असलेल्या स्त्रिया
बॉडीगार्डसारख्या मागे असत. तेव्हाचा कदाचित शारीरिक सुखाकडे बघण्याचा
दृष्टिकोन स्वाभाविक होता.
पापभीरू पांढरपेशा समाजात समलिंगी संबंधांचा
बाऊ झाला. त्यात लपवाछपवी आली. स्वत:ला नीट समजून घेण्याआधी लग्नबंधनात
अडकल्यामुळे जोडीदारांची फसवणक झाली. समाजमान्यतेसाठी ठरावीक प्रकारे वागणं
आलं. हे संबंध मान्य करण्याची धमक नसल्यानं गवगवा झाला. ज्यांना ही
संकल्पनाच समजली नाही त्यांनी निंदेचं शस्त्र काढलं. त्यामुळे जे
साचेबद्धपणे जोडीदार निवडून, मुलाबाळांना जन्म देऊन फोटोफ्रेमला साजेसा
संसार मांडतात ते 'बरोबर' आणि बाकीचे 'तसले धंदे करणारे' अशी भावना
बळावायला लागली. गुपचूप एखादी गोष्ट केली तर ती राजमान्य- पण उघडपणे बोलली-
तर ते पाप- हा गोंधळ आता संपवायला पाहिजे.
मी जेव्हा अमोल पालेकरांचा
'दायरा' हा सिनेमा केला, तेव्हा या विषयाबद्दल बरंच कळत गेलं मला. यात
निर्मल पांडेनी- जन्मानी पुरुष पण मनानी स्त्री असलेल्या-
'ट्रान्सवेस्टाईट' व्यक्तीचं काम केलं होतं. निर्मल माझा मित्र. उंचापुरा,
तगडा, मर्दानी. सतत मुली/ बायका त्याच्यामागे लागलेल्या असत. त्याला मी
शूटिंगच्या पहिल्या दिवशी साडीमध्ये पाहिलं आणि हक्काबक्का झाले. अतिशय
तरलपणे आणि सूचकतेनं अमोलदांनी ही गोष्ट हाताळली आहे. फार बरं झालं हा
सिनेमा माझ्या वाटय़ाला आला. मला हे माहिती नसलेलं विश्व समजत गेलं.
त्यानंतर कायम मला या वेगळ्या माणसांबद्दल एकाच वेळी दिलगिरी, अनुकंपा आणि
कौतुक वाटत आलं आहे. जन्माला येताना चॉइस असता तर सगळ्यांनीच
सर्वगुणसंपन्नतेचा वर मागून घेतला असता. पण न मागता मिळालेल्या या
वेगळेपणाला अभिशाप न मानता वरदान मानून अनेकजण आयुष्याचं सोनं करतात.
'दायरा'ची उपओळ होती- द स्क्वेअर सर्कल. वर्तुळ चौकोनी कसं काय असू शकेल?
पण काही आयुष्यांचं असतं. त्याबद्दल कुचाळक्या करण्यापेक्षा, गट
पाडण्यापेक्षा स्वत:चं आकलन सुधारूया.
जे माझं सचिनमुळे विस्तारलं. सचिन
कुंडलकर या माझ्या परमप्रिय मित्राचं 'कोबाल्ट ब्लू' हे पुस्तक वाचलंय
तुम्ही? या पुस्तकानं मला जन्मभराचं शहाणं केलं. इतकं गलबलून आलं होतं मला
वाचताना. पंचविशी-तिशी ओलांडून आपल्या ठोस व्यक्तिमत्त्वापर्यंत अराइव्ह
होण्याआधी आपण प्रत्येकजण मूल असतो, बाल्य असतो, शाळेत जातो. स्वत:च्या
अनुभवांना, जडणघडणीला पाहून बिचकतो.. भिऊन जातो. पण आपल्याला आपल्या
घडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाशी जुळवून घ्यावं लागतं- तसंच सगळ्यात आधी शरीराशी
जुळवून घ्यावं लागतं. ते करताना काही जणांची किती ओढाताण होते. लहान असताना
मुस्कटदाबी होते, घुसमट होते. काही जणांच्याच मनाची आणि शरीराची.. असं का?
-सोनाली कुलकर्णी.
लोकसत्ताच्या सोजन्याने
Saturday, June 22, 2013
Sunday, April 21, 2013
चवीने खा..त्याचा काथ्या कूट कशाला..
काही लोकांना चवीचं चर्वितचर्वण करण्याची सवयच असते.
उदाहरणार्थ, चार-पाचजण मिळून हॉटेलमध्ये गेले, एखादा पदार्थ आवडला की नुसतं
छान आहे ना. म्हणून गप्प बसत नाहीत लगेच चर्चासत्र सुरू. 'लसणाचा तडका छान
बसलाय.'
'नाही नाही लाल मिरची आहे अहो.'
'नाही गं. लवंग आणि तमालपत्र घातलं असणार.'
'हो का? मला नाही वाटत. हे बघ लसूण आहे ना डाळीत.'
हे बोलताना डिशमध्ये गुप्तहेरांनी नकाशा मांडावा, तसा भात. त्यात खळगा करून दाल- पुन्हा परीक्षणासाठी म्हणून घेतलेला एक ओहोळ शिवाय तिरक्या पडलेल्या चमच्यात चवीला म्हणून घेतलेली थोडी दाल या दृष्यांनी बाऊल, हंडय़ांमधून आकर्षकपणे आणलेल्या पदार्थाची रयाच गेलेली असते. भात वाळतो, दाल गार होते.
पदार्थाच्या चवीचं किंवा घातलेल्या सामग्रीचं असं विच्छेदन करणं मला जरा भीषणच वाटतं. म्हणजे एखाद्या सज्जन व्यक्तीच्या रूपा-गुणांची कशी मनसोक्त चिरफाड करतात काहीजण. तसं. 'हो हो व्यक्तिमत्त्व आकर्षक आहे, पण केस फारच पातळ आहेत.' 'बाकी ठीक आहे. पण नाक किती मोठं आहे.!' 'नाही बोलण्यात आहेच जरा तोतरेपणा.' 'मदतीला पुढे असतात पण जेवताना आडवा हात!' गुण येतो त्यांच्या औषधांनी पण अपॉइंटमेंट घेऊनच जावं लागतं!' एक मिनिट, आपल्याला कशात रस आहे? माणसाच्या कामात, वर्तनात की काथ्याकूट करण्यात? असो, पण 'कूट' हासुद्धा काहीजणांच्या काथ्याचा. आय मीन. काटय़ा-कुटांचा असू शकतो.
आम्ही काही मित्र-मैत्रिणी एका थाय-रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. मी पहिल्यांदाच थाय फूड बघणार. खाणार होते. शिफारशीवरून मी 'रॉ पपाया सॅलड' मागवलं- आणि मला ते खूपच आवडलं. जेमतेम तिसरा घास तोंडाच्या दिशेनी जात असताना एक मित्र स्वत:चं ज्ञान पाजळायला उद्गारला, 'त्यात काय एवढं, फक्त पपई किसून दाण्याचं कूट घातलंय.' मला ना असला राग आला मित्राचा. आपल्याला दिसत नसला म्हणून काय झालं, पण तिथल्या शेफनी किती प्रेमानी सजवून पाठवली होती सलाडची डिश. लगेच 'फक्त कूट' वगैरे कॉमेंट मारून पेपर कशाला फोडायचा? माझ्या एक स्वत:ला सुगरण म्हणवणाऱ्या चिकित्सक नातेवाईक बाई आहेत. तिला सर्व पदार्थ घरी करून बघण्याची हौस आहे आणि स्वत:च्या असल्या हौशीसाठी ती बाकीच्यांना तोंडाला फेस येईपर्यंत कामाला लावते.
तर फास्ट फूड प्रकार नवीन होते, तेव्हा तिला पिझ्झा म्हणजे काय- याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. पुण्यातल्या संभाजीपार्क जवळच्या एका हॉटेलात मी तिच्याबरोबर का गेले असा मला महापश्चात्ताप झाला- नंतर. कारण गुन्ह्य़ाच्या केसमधल्या मृतदेहासारखं तिनी त्या पिझ्झ्याचं डीटेल्ड पोस्टमार्टेम केलं. प्रत्येक पापुद्रा, चीझ, भाजी उभी-आडवी सोलून फाडताना 'इ. अच्छा. एवढंच होय.' असल्या उद्गारांची खैरात चालू होती. टेबलवरच्या दुसऱ्या पिझ्झासमोर हा कुरतडलेला पिझ्झा बिचारा 'कोण होतास तू- काय झालास तू' अशा अवस्थेला आला होता. नंतर चव बघण्यासाठी म्हणून तिनी भाजीपोळी खाल्ल्यासारखा सारण आणि पिझ्झाबेसचा घास घेतला. त्या पुढच्या भेटीत लगेच तिनी तिच्या प्रयोगशीलतेची चुणूक दाखवली. बेस म्हणून नीट न भाजलेल्या कच्च्या जाड पोळीसारखा कणकीचा लगदा आणि वर सुचेल त्या भाज्यांची कोशिंबीर. छे छे! ते पाहून हॉटेलमधल्या पिझ्झ्यांनी चुल्लूभर सॉसमध्ये बुडून जीव दिला असता.
वाढला गेलेला पदार्थ प्रेमानी, चवीनी खाऊन त्याला सहज, उत्स्फूर्त दाद देणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. अनेकांना दुसरा घासही तोंडात जाण्याआधी ताबडतोब कृती जाणून घ्यायची असते. भोपळ्याचं भरीत का?. 'अच्छा. हिंग.? मग फोडणी वर घालायची की भरीत परतवायचं कढईत?' किंवा ब्रेड पुडिंग घरी केलं असं म्हटल्याक्षणी. 'काय काय घातलं, कसं केलं.' सुरू प्रश्नांची सरबत्ती! लगेच कुकिंग क्लासला आल्यासारखं बोलायला दुसरं काही सुचत नसल्यासारखं करतात काहीजण. 'कडिपत्त्याची किती पानं घालायची. गुळाच्या ऐवजी साखर चालेल का.' अशी वाक्यं कानावर आली की मला न राहवून हसायलाच यायला लागतं.
'आस्वाद' हा फार खासगी आणि स्वानंदाचाही भाग असतो. फुशारक्या मारणारे खवय्ये नको वाटतात. घरच्या गृहिणीला काही सुचूच देत नाहीत असे लोक. एकदा एका बाईंनी, 'तू खिचडी रिफाइण्ड तेलात करतेस आम्ही तर तुपात करतो.' असं म्हणत आकाशपाताळ एक केलं होतं. मी त्यांच्या मा-यासमोर जरा ओशाळून गोंधळलेच होते. नंतर कळलं, त्यांचं तूप म्हणजे डालडा. माझ्या कल्पना विस्ताराला मी डालडय़ातली साबुदाण्याची खिचडी कशी लागत असेल- याकडे जाऊच दिलं नाही. चवीनं खाणारे कळतात आपल्याला. किमान आपण स्वत: तरी चवीनं खाणारे असावं. असं मला फार मनापासून वाटतं. त्यात करणा-याच्या कौशल्याचं कौतुक आणि त्यांच्या कृतीतल्या कळीच्या गोष्टीचं बिंग न फोडण्याची बूज असावी. आपण करून पाहायचं असेल तर कृती विचारताना हं चला- चटाचटा फॉम्र्युला सांगून टाका- अशा भावनेनी म्हटलं- तर सांगणा-यांचा किती विरस होतो.
अलीकडे आईनी शिकवलेली माझी एक कैरीची चटणी माझ्या काही जवळच्या आणि नात्यातल्या मैत्रिणींमध्ये हिट झाली आहे. मला माहितीए त्या चवीनी खाणा-या आहेत. त्यांच्यासाठी ती चटणी परत परत करताना किंवा एखाद्या वेळी कृतीसाठी आलेल्या फोनवर बोलताना माझी कळी इतकी खुलते. काय सांगू..
-सोनाली कुलकर्णी.
( हा लेख लोकसत्ताच्या सौडन्याने घेतला आहे)

Friday, March 1, 2013
त्यांचा मान राखणं आपलं कर्तव्य आहे
नवरा-बायको या दोघांना गृहमंत्री मानलं तर घरी काम करणारे बाकीचे
उप-गृहमंत्री झाले ना. मंत्री आपणच निवडलेले असतात. त्यांचा मान राखणं आपलं
कर्तव्य आहे.
किती धावपळीचं झालंय जगणं. धापा टाकत कामावर पोचायचं आणि तसंच धापा टाकत घरी परत यायचं! पण या दोन्हीच्या दरम्यान जेव्हा आपण काम करतो, तेव्हा सोबत आपले वरिष्ठ, कनिष्ठ, बरोबरीचे सहकारी असतात. त्यांच्याशी विनोद -गप्पा होतात. कधी आपण ऑफिसमधून लवकर निघून सिनेमा - नाटक -प्रदर्शनाला जाऊ शकतो. कधी कुणाच्या वाढदिवसासाठी सरप्राइझ लंचचा बेत ठरवला जातो. कधी अर्धी सुट्टी मिळते. एकुणात दगदग झाली तरी आपला वेळ खेळीमेळीत जातो. आपल्या घरी जी माणसं कामाला येतात त्यांच्यासाठी आपण हा विचार का करू नये? भांडी, झाडू-कटका (मुंबईच्या भाषेत.) स्वैपाकाच्या बाई, ड्रायव्हर, आजारी व्यक्तींची देखभाल करायला ठेवलेले नर्स किंवा मुलांना सांभाळणा-या चोवीस तास आपल्या घरी राहणा-या मुली. यांच्या भावविश्वाचा आपण कधीतरी विचार करतो का. किंवा त्यांनासुद्धा भावविश्व असू शकेल-असं तरी कुणाच्या मनात येतं का?
अजूनही अनेकदा- वैतागणे, डाफरणे, उपमर्द, पगार कापण्याची धमकी- थोडक्यात कटकट म्हणून आपण या गृह-मदतनीसांकडे बघतो. सुट्टी मागितल्याक्षणी- अरे देवा. मागच्या महिन्यात पाय मुरगळल्याची थाप मारून घेतली होतीस की सुट्टी. असा चढा सूरू लागतो आपला. खरं तर आपल्याला म्हणजे नोकरदार लोकांना महिन्याला हक्काच्या चार सुट्टय़ा मिळतात, क्वचित पगारवाढ- बोनस आपल्या वाटय़ाला येतात. पण जिथे आपण बॉस असतो, तिथे मात्र दुसऱ्याच्या हक्कांबाबत-अडचणींबाबत संपूर्ण बेदखल राहतो. मुख्य म्हणजे खोटं बोलण्याची वेळच का येऊ द्यावी कुणावर? काम करणा-या प्रत्येक माणसाला महिन्यातून तीन-चार सुट्टय़ा मिळाल्याच पाहिजेत. आपल्याला तरी बँक हॉलिडे, बंद, राष्ट्रीय सण, दहशतवादी धोके- अशा अनेक कारणांमुळे सुट्टय़ा मिळतात- पण या उप-गृहमंत्र्यांनी मात्र जिवाची पर्वा न करता कामावर हजर असावं अशी अपेक्षा कशी करतो आपण. हॅलो, अजून कशी आली नाहीस तू. ऐवजी 'आज वातावरण तंग दिसतंय- तू येऊ नकोस.' असा काळजीनं फोन कधीतरी करतो का आपण?
मोलकरणींना शिळे अन्न वाढणे, कायम आपले फाटके कपडे, जुन्या साडय़ा देणे, दिवाळीला दुप्पट पगार देताना काचकूच करणे, अपमानास्पद - दुय्यम दर्जाची वागणूक देणे, हा आता गया जमाना झाला. त्याउलट काही नवे विचार स्वागतार्ह वाटतात. उदा. आपल्या घरी मदतनीस असतील तर शिळा घास इतर कुटुंबीयांनाही वाटून घेऊन, मदतनीस ताजेही अन्न घेईल हे लक्षपूर्वक पाळणे. जुने कपडे आपल्याला नको असल्यामुळे आपण दुसऱ्याला घरी न्याल का असं विचारतो. त्यात दातृत्वाची भावना नसून आपली गैरसोय दूर केल्याबद्दल कृतज्ञता बाळगावी. आपल्या टीमला क्वचित एखादी नवी वस्तू भेट द्यावी. त्याहीपेक्षा वाढती महागाई बघता वस्तूंपेक्षा रोख रक्कम द्यावी. ड्रायव्हरना कसे ओव्हरटाइमचे जादा पैसे द्यावे लागतात, तसंच उप-गृहमंत्र्यांनासुद्धा जास्त पोळ्या केल्याबद्दल, फर्निचर हलवून स्वच्छता केल्याबद्दल दखल ठेवून चार पैसे जास्त द्यावे कधीतरी. आपण वापरून जुना झालेला शर्ट कदाचित मापाला बसणार नाही किंवा चक्क आवडला नाही. पण त्याऐवजी पन्नास शंभर रुपये दिले तर `फॉर अ चेंज`घरी जाताना रिक्शा करता येते.. आवडीची चप्पल घेता येते.
या घरगुती टीमच्या तब्येतीची आपण जरा तरी काळजी घ्यायला पाहिजे. बायको, बाळ, आई-वडील, यांच्याबद्दल आपण सतर्क असतो. हॉस्पिटलच्या खर्चासाठी हात सढळ ठेवतो.. मग आपलं रोजचं जगणं सुलभ, आनंदी करणा-या या बाकी जिवांचाही विचार केलाच पाहिजे. पॉलिसी इ. घेतल्यामुळे अनेकांना वैद्यकीय सुविधा अल्प दरात मिळतात. घरगुती टीमला आपण किमान औषधाचा खर्च किंवा डॉक्टरची फी तरी देऊ करावी. माणुसकी, पगारवाढ, वैद्यकीय मदत, मुलाबाळांच्या शिक्षणाची चौकशी, उपयुक्त सल्ले.. हे आपण जाणीवपूर्वक जपलं तर आजच्या काळातसुद्धा आपण एकत्र कुटुंबासारखं वातावरण टिकवू शकतो. आपल्या प्रत्येकात एक छुपं नेतृत्व असतं. फक्त संकोच! आळशीपणा यामुळे आपण त्या वृत्तीला बाहेर डोकावू देत नाही. पण घरातल्या घरात लीडर झालो तर जितकी जबाबदारी घ्यावी लागते ती आपल्या डाव्या हातच्या खेळाइतकी सोपी असते. शिवाय त्याचे फायदेही कितीतरी असतात.
कधी कधी आपण पुढाकार घेतल्यामुळे किंवा सहज भुणभुण लावल्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडतात. कुणी शिक्षण पूर्ण करतं. कुणाची वाईट संगत सुटते. कुणी जास्त पैसे कमवायला लागतं. कुणाचं लग्न ठरतं. भांडणं मिटतात. नातेवाईक, जवळचे मित्र, सहकारी यांच्या भावविश्वात आपल्याला स्थान असतं ना. तसंच ते उपगृहमंत्र्यांच्या मनातही असतं. त्याची बूज राखून आपापलं भावविश्व समृद्ध केलं. तर एखादा अंगावर येऊ पाहणारा, आपल्याला अगतिक करून सोडणारा दिवस नकळत सुसह्य़ होतो. घरी आल्यावर दार उघडणारा मदतनीस समजुतीचं हसतो, स्वैपाकात आवडीची भाजी असते, आपल्या धकाधकीच्या आयुष्यात किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
अनेकदा नुसतं पाच मिनिटं गप्पा मारल्यानी घरातल्या सहकाऱ्यांना बळ मिळणार असतं. नुसतं तंगडय़ा पसरून चहाऽऽऽ कॉफीऽऽऽ अशा ऑर्डर सोडण्याचे दिवस गेले आता. तसं करायचं असेल तर मजबूत पैसे मोजून हॉटेलमध्ये जावं लागतं आणि वर टीप देऊन चांगली वागणूक दिल्याबद्दल आभार मानावे लागतात!
- सोनाली कुलकर्णी.
(हा मजकूर लोकसत्ताच्या सौजन्याने )

Sunday, February 10, 2013
नाव ठेवलं असताना..अपभ्रंश कशासाठी?
टोपणनावांचा लेख- आणि त्यात पंजाबी नावांचा
उल्लेखसुद्धा नसावा? बरोबर आहे. टोनी, पप्पी, डॉली, मिका, पोनी, गुड्डू
इत्यादी व्यक्तिमत्त्वांना ओळखत असलेले अनेक जण फुरंगटून बसले. पण खरं
सांगू का? बिल्लू सिंग, हॅरी प्राजी, डिंपी आंटी हे सगळे मला फार ओरिजनल
वाटतात. त्यांचं खरं नाव तेच असत असेल कदाचित. नाहीतर हरपाल सिंग, मनमीत
शेरगील, जसविंदर कपूर अशा माणसांना पाळीव प्राण्यांसारखं कशाला संबोधेल
कोणी.
का कोण जाणे पण मला मात्र कुणाला टोपणनावानं हाक मारणं जमतच नाही. फार संकोच वाटतो. खरंच. पक्या, पश्या, उप्या, अंडय़ा, सम्या, निख्या. छे छे. अगदी जवळचे असले, तरी मी पूर्ण नावच घेते. इतकी चांगली नावं असताना अपभ्रंश कशाला करायचा? अनेकदा नसलेली सलगी दाखवायला काही जण चतुराईनी टोपणनावाचा वापर करतात. कशात काही नाही- आणि उगाच ए अनु. किंवा चल बाय रे संजा. असं म्हणत काही जण जे लाडात येतात- ते कमालच वाटतात. मला हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उपनावं निर्विवाद वाटतात. सगळ्यात पहिला म्हणजे आमचा जगन् मित्र असा 'नाल्टय़ा' - उद्या बराक ओबामा जरी- हेलो नाल्टय़ा-हाऊ आर यू म्हणाले तरी आम्हाला काही आश्चर्य वाटणार नाही. कारण त्याला स.ग.ळे.जण ओळखतात आणि 'नाल्टय़ा' ह्य़ा अद्वितीय नावानीच ओळखतात. आणि दुसरा म्हणजे प्र. ना. संतांचा लंपू. इतकं गोड टोपणनाव कसं असू शकतं? वनवास, पंखा, शारदा संगीत वाचलंय ना? तुम्हीही प्रेमात पडाल.
माझ्या एका मैत्रिणीला घरचे मिटी म्हणतात. आम्ही रसिका म्हणून ओळखतो तिला आणि आता सासरी तिचं नाव 'रोशनी' ठेवलंय. आपलीच किती नावं लक्षात ठेवायची. आपण! कुणीतरी तिला मिंटीताई म्हणणार, कॉलेजमध्ये नाटकात रसिका भाग घेणार. सासरी सत्यनारायणाच्या पूजेला रोशनी नवऱ्याबरोबर दांपत्य म्हणून बसणार. लग्न झाल्यावर मुलीचं नाव बदलणं ही एक अजबच पद्धत होती नाही? फक्त आडनाव बदलून नवं कुटुंब सुरू करण्याची पद्धत- सोय म्हणून आपण एक वेळ समजून घेऊ. पण ज्या नावानी जन्मापासून वीस-पंचवीस-तीस वर्षे आपण खरेखुरे नावारूपाला आलो. ती आयडेण्टिटी अशी अचानक सोडून द्यायची?
एकेकाळी हे फार सहज आणि स्वाभाविक वाटायचं. लहान असताना मी सुद्धा नव्या येणाऱ्या काही वहिन्यांची नावं निवडण्याच्या खेळात उत्साहानी भाग घेतला आहे. पण मोठं होईल तसं ते विचित्र वाटायला लागलं. ओळख झाल्यावर, साखरपुडय़ाला-अगदी अक्षता पडेपर्यंत आपण त्या मुलीला तिच्या माहेरच्या नावानी हाक मारायची आणि लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशीपासून अचानक नवं नाव. किती विलक्षण आहे हे. अगदी ठरवून नवी भूमिका करत असल्यासारखं. सिनेमा-नाटकासारखं. आम्हाला कसं प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी वेगळं नाव असतं. 'सिंघम' मध्ये 'मेघना' होतं. पुणे ५२ मध्ये 'प्राची आपटे' होतं. आणि प्रत्यक्षात सोनाली. तसा खराखुरा 'मेक बिलीव्ह'चा खेळ. वैवाहिक आयुष्यात वेगळी भूमिका. पूर्वायुष्याचा वेगळा सिनेमा.
तरीपण लहानपणी आईबाबा लाडानी काहीतरी म्हणतच असतात. घरातल्या माणसानी आपल्या नावाचा जो शॉर्टकट पाडलेला असतो तो किती गोड आणि आपलासा वाटतो ना. श्रीधर नावाच्या माझ्या मावसभावाला कर्नाटकात राहणारे माझे मावशी-काका 'शिरपा' म्हणून इतकं प्रेमानं संबोधायचे. श्रीकांत नावाच्या मावसभावाला घरी कांतू म्हणायचे आणि आम्ही कांतूदादा. रेवती हे नक्षत्राचं नाव असूनसुद्धा माझ्या चुलत बहिणीला अजूनही आम्ही सगळे राणी म्हणतो. कधी बोबडय़ा बोलांमुळे काही गमतीशीर नावं पडतात. आत्ता लिहिताना आठवलं- 'संदीप' म्हणता यायचं नाही त्यामुळे कितीतरी दिवस मी बंचीदादा म्हणायचे संदीपला. माझ्या मावसबहिणीची मुलगी रीना छोटी असताना, मला छान ठसक्यात सोन्नुमौशी म्हणायची. अजूनही काही मित्रमैत्रिणी मला चिडवताना सोन्नुमौशी म्हणतात.
मोठमोठी माणसंसुद्धा तुम्हाला घरी काय म्हणतात- असा विषय निघाला की विरघळून जातात भूतकाळात. आपल्याला नुसतं नाव नाही तर ती हाक मारणाऱ्या त्या त्या माणसाची स्टाइल आठवते. मला आजतागायत कुणी माझ्या आडनावानी हाक मारलेली नाही. अपवाद आठवीत असताना ऑफ तासाला आलेल्या झानपुरेबाईंचा. कुलकर्णी जेव्हा त्या म्हणाल्या तेव्हा वर्गातल्या सात-आठ जणांनी चमकून वर पाहिलं- मग कळलं त्या माझ्याकडे बघत होत्या. मी आश्चर्यानी मी? म्हणतही पुढे गेले होते. पुढे आणखी एकदा त्यांनीच जिन्यात 'ए हिरवा स्वेटर' अशी हाक मारली होती मला.
सगळ्यात मस्त म्हणजे चैत्र सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर पुण्यात आमचा सत्कार होता- फिल्म अर्काइव्हज्मध्ये. तिथे स्टेजवर बोलवताना अशा वेळी करतात तशी दोन-तीन विशेषणं लावून सोना ऽऽ ली कुलकर्णी ऽऽऽ अशी झोकात माझ्या नावाची घोषणा केली गेली. बाहेर आल्यावर माझी चिमुकली भाची हसत हसत म्हणाली, ''अशं काय म्हनाले ते? नुत्तं शोनी आत्त्या अशं म्हनायचं'' आता कुठल्याही स्टेजवर जाताना मला कानात तेच ऐकू येतं आणि सगळं हलकं, सोप्पं वाटतं.
खरंच आपण कोण असतो नक्की? हाक मारली जाते ते, शाळेतल्या नावाचे, पासपोर्टवरचे की प्रसिद्धीच्या नावाचे? म्हणजे एखादी व्यक्ती सीमावहिनी / सीमाताई / सीमाआंटी / सीमु / सीमा फडके आठवी ब/ फडके मॅडम किंवा जोशीकाका / जोशीसाहेब / श्रीयुत रवी जोशी / रवीमामा / रव्या / रोहनचे बाबा, राधिका जोशींचे मिस्टर.. नक्की कोण असतो? की सगळेच असतो? त्यातला एखादा 'मी' आपल्याला नकोसासुद्धा असत असेल. त्या भित्र्या किंवा बुटक्या- म्हणून हिणवल्या गेलेल्या 'मी'ला आपण कधीच ओलांडून आलेले असतो. पण ओळखीचं कुणीतरी त्याच 'मी'च्या आठवणी-किस्से सांगायला लागलं- तर शब्दश: नामानिराळं वाटतं ना अशा वेळी?
मोठय़ा माणसांबद्दलही असंच वाटतं मला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्यांची घरची माणसं काय म्हणत असतील? मिस्टर प्राइम मिनिस्टरना घरचं असायला कितीसा वेळ मिळत असेल? कॉर्पोरेट जगातल्या उच्चपदस्थ- बॉस लोकांना कामाच्या रगाडय़ात ती घरची हाक कानी पडण्यासाठी किती ताटकळावं लागत असेल. अमिताभ बच्चनना हरिवंशरायसाहेब आणि तेजी आंटी काय म्हणत असतील? अमितजी ती हाक मिस् करत असतील का आता?
मला मात्र आयुष्यात पहिल्यांदा एक वेगळी हाक कानावर पडते आहे. माझी मुलगी 'आई' म्हणायला शिकली आहे. गेले दोन महिने त्या हाकेला 'ओ' देण्यात मी इतकी इतकी रममाण झाली आहे की बाकीचं काहीच ऐकू येईनासं झालं आहे.
- सोनाली कुलकर्णी.
( हो लेख लोकसत्ता दैनिकाच्या सौजन्याने वापरला आहे)

Saturday, February 2, 2013
टोपणनावं..विशेषणाइतकी सुंदर
''एक मिनीट सोनाली. तुझी ओळख करून देतो. ही माझी गर्लफ्रेंड. न्यूयॉर्कला असते.''
''हॅलो. नाव काय तुझं?'' मी विचारलं.
त्यावर ती सुंदरा जे उत्तरली, ते ऐकण्यासारखं आहे-
''अॅक्चुअली माझं नाव मीनाक्षी आहे. पण घरी सगळे मला प्रियांका बोलतात (बोलतात?!) आणि फ्रेंडमध्ये मी मॅक्सी म्हणून नोन आहे. (नोन! के.एन.ओ.डब्ल्यू.एन.!) आणि हा (म्हणजे बॉयफ्रेंड) मला मुमू म्हणतो..'' वर ती लाजून मुरकत हसायला लागली.
मी चकित होऊन पाहत राहिले. शेकहॅण्डसाठी पुढे झालेला हात स्टॅच्यू घातल्यासारखा अधांतरी तिच्या हातात झुलत राहिला.
मीनाक्षी, प्रियांका, मॅक्सी आणि मुमू असलेल्या त्या मुलीला मी सभ्यतापूर्वक खेळकरपणे म्हटलं. ''बाप रे. इतकी नावं? मग मी काय म्हणू तुला? त्यावर गळ्यातले केस घोळवत ती कन्यका वदली. विल यू कॉल मी नक्श? कारण बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतल्यावर मी माझं नाव 'नक्ष' लावणार आहे.''
मला शेक्सपीअरच आठवला- नावात काय आहे- म्हणणारा. अगदी गेल्याच आठवडय़ात एक मैत्रीण त्वेषानी नवीन शिकलेला एक फंडा सांगत होती- म्हणे प्रत्येक माणसाला आपापल्या नावाचा अंश मिळतो. जेव्हा काही माणसं म्हणतात ना, की खरं म्हणजे माझ्या आईला माझं नाव अमुक ठेवायचं होतं. पण राहिलंच. अशा व्यक्तिमत्त्वामध्ये अपूर्णता असते म्हणे. कारण अधुरी इच्छा त्यांच्या ओळखीला- म्हणजे नावालाच चिकटून येते.
मधे एकदा आमच्या एका जवळच्या मित्रानी आम्हाला सगळ्यांना फार गंभीरपणे विनंती केली- की मला माझ्या ख-या नावानी ओळखा प्लीज! शाळेत असल्यापासून त्याचं एक नाव पडलं होतं. तो त्याच नावानी ओळखला जायचा. इतकं की फोनच्या डायरीत किंवा मोबाइलमधेही टोपणनावानीच त्याचा नंबर सेव्ह केला गेला होता. पंधरा वर्षांच्या ओळखीनंतर आणि घरगुती मैत्रीनंतर आता मला मूळ नावाने संबोधा. हा आग्रह आमच्या पचनी पडायला वेळ लागला. शिवाय तो आग्रह आम्हाला आमच्या आईवडिलांपर्यंत पोचवावा लागला. ब-यापैकी कसरत करून सवय बदलावी लागली.
अगं तो '..' येऊन गेला असा निरोप सांगताना आई-बाबा टोपणनावच घ्यायचे. मग जरा वर्ष-दीड वर्षांनी अंगवळणी पडलं त्याचं खरं नाव.
तसंच माझ्या मोठय़ा भावाचंही झालं होतं चुकून. संदीपला मी पहिल्यापासून दादा म्हणते. त्याची ओळखही मी- हा माझा दादा अशी करून द्यायचे. पहाता पहाता माझे मित्र-मैत्रिणी, काही सहकलाकार, दिग्दर्शक. सगळेच त्याला 'दादा' म्हणायला लागले. तेव्हा त्यांना आणि स्वत:लाही आठवण करून द्यावी लागली- की त्याचं खरं नाव 'संदीप' हे बाजूला पडून 'दादा' हेच नाव रुळायला लागलंय. नंतर मग मी लक्षात ठेवून 'माझा मोठा भाऊ- संदीप' असं सांगायला लागले.
पण टोपणनावं किती मजेदार वाटतात ना. मधे एका फाइट सिक्वेन्सच्या शूटला एक धिप्पाड स्टंटमॅन आला. त्याला कुणीतरी हाक मारली- ए बबलू.! समोरच्या दहा माणसांना एका मिनिटात चीत करेल अशा माणसाचं नाव बबलू? तसाच आमचा एक प्रॉडक्शन मॅनेजर- चिंटू म्हणे! त्याच्या व्यक्तिमत्त्वात काही म्हणजे काही चिंटूपणा नव्हता. इतका तो दणकट होता.
बंगाली टोपणनावं हा त्यांच्या संस्कृतीतला अविभाज्य घटक म्हणायला पाहिजेत. खरी नावं इतकी सुंदर, विशेषणांसारखी अलंकारिक असताना मजेदार टोपणनावं का ठेवावीशी वाटतात कोण जाणे. इंद्रनील, स्वप्नदत्त , शर्बाणी, ऋतुपर्णा अशा नावाच्या माणसांना घरी कोको, शोना, बुबुन मोनु, छुमकी, पोल्टु, बाप्पा, मोंटु, बिश्तु असं काहीही म्हणू शकतात. मुळात बंगाली भाषा इतकी सुमधुर. त्यात आपल्या मावशी, काका वगैरे नातेवाईकांना अशा गोड गुणिले मजेदार उपनावांनी बोलवणं अजूनही मिष्टी वाटतं नाही.
आपल्याकडे त्यामानानी शिस्तशीर एकनावीच कारभार असतो. फारतर नाना, भाऊ, माई, ताई. इतकंच. माझ्या आईच्या आईला मी आक्का आज्जीच म्हणत आले. ती नुसती आज्जी नाही आणि तिच्या औपचारिक नावाची जानकी आज्जी पण नाही. लोण्यासारखी मऊ मऊ आक्का आज्जीच. ही नावं पडत जातात. कुणीतरी तशी हाक मारत असल्यामुळे. आता माझ्या मोठय़ा मावशीला तिची स्वत:ची मुलंसुद्धा ताई म्हणतात. आणि आम्ही अर्थातच ताईमावशी. बाबा, काका, आत्त्या त्यांच्या वडिलांना आण्णा म्हणायचे. त्यामुळे आम्ही नातवंडं पण आण्णाच. आपल्या प्रत्येक कुटुंबात, कुठल्या तरी पिढीत एक बेबीमावशी किंवा बेबीआत्या असायचीच नाही? आता प्रत्येक जोडप्याला एखादंच मूल. फारतर दुसरं. त्यामुळे चिल्ल्यापिल्ल्यांचा पसारा, चुलत-मामे-आत्ते बच्चेकंपनी एकत्र झाली तर दोन-चार डझन सहज भरायची. त्यात कुणीतरी नाना, भाऊ, माई असायचेच.
आता ही संबोधनंच लोप पावत चालली आहेत. भावंडंच कमी- मग आक्का/ ताई/ दादा म्हणणार कुणाला...
-सोनाली कुलकर्णी.
( हा लेख लोकसत्ता देनिकाच्या सौजन्याने)

Sunday, January 27, 2013
आय अॅम हॅप्पी टू बी लॉस्ट. .
एखादी गोष्ट हरवल्यावर तुम्हाला कधी आनंद झालाय? विचित्र वाटेल, पण मला झालाय. अगदी गेल्याच आठवडय़ात माझा मोबाईल फोन हरवला. हरवला म्हणजे त्याला एक कहाणी आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शूटिंगहून परतत असताना बाळासाठी म्हणून गाडी थांबवावी लागली. मी गडबडीनी खाली उतरले. तेंव्हाच बहुतेक पडला फोन. पडल्याचं सुद्धा नंतर बऱ्याच वेळानी लक्षात आलं माझ्या. कारण फोन 'सो.कुल' प्रोफाईलवर होता. म्हणजे फक्त व्हायब्रेटरवर. आधी वाटलं, गाडीतच कुठेतरी पडला असेल. पण शोधेपर्यंत पोचलो घरी मुंबईला. मग खात्री पटली- की नक्की पडला फोन. परत कुठे जाणार शोधायला? गेला बिचारा. १९९७ पासून बरेच हॅण्डसेट बदलले, पण हरवणारा हा पहिलाच!
झालं! सगळे कॉण्टॅक्ट नंबर, एसएमएस, आठवण म्हणून डीलीट न केलेले मेसेज. सगळं गेलं. पण फारच काव्यात्मक पद्धतीनं झालं हे सगळं.
पुणे-मुंबई रस्ता हा माझा अतिजवळचा मित्र. त्याच्यावरच कुठेतरी फोन पडावा. तोही इतक्या शिताफिनी. बरं, चूक किंवा निष्काळजीपणा माझा स्वत:चाच. तोही आयुष्यात पहिल्यांदाच. मग चिडायचं तरी कसं आणि कुणावर? त्या रात्री घरी पोचल्यावर हळहळ फार वाटली, पण सकाळी उठले तर अहो आश्चर्यम्! चक्क हुश्श वाटत होतं मला. त्रास देणाऱ्या फॅन लोकांचे निनावी मिस्ड कॉल पाहून वैतागणं, नवे एसएमएस पाहिल्यावर, अजून जुन्यांना उत्तर पाठवणं बाकी आहे, ओळखीच्या नंबरांना कॉल बॅक करायला पाहिजे- हे सगळं वाटून सकाळी सकाळी कावरंबावरं होतं- ओशाळल्यासारखं वाटणं पण टळलं. आणि लक्षात आलं, अरेच्या! नवीन सिम कार्ड, फोन घेईपर्यंत आपण कुणालाच शब्दश: 'आन्सरेबल' नसणार आहोत टुणकन् उडीच मारली मी आनंदानी.
गेले किती महिने मी विचार करतीए. की, इंटरनेट, मोबाइल फोन हे सोयीपेक्षा लोढणं झाले आहेत. नवनवीन 'स्मार्ट' फोन तर अक्षरश: मान वर करायला उसंत मिळू नये अशी व्यवस्था करतायत. काय काय डाऊनलोड करता येतं, प्रचार करता येतो, कनेक्टेड राहता येतं, कमेन्ट करता येतात. देवा! नवीनच गुलामी सुरू झाली आहे. फोन उचलला नाही, तरी कॉल रिटर्न करणं आलं, एसएमएस ला उत्तर पाठवणं तरी सभ्यता म्हणून अनिवार्य झालं, त्यात ब्लॅकबेरीच्या स्टेटसवरसुद्धा प्रतिक्रिया येतात. व्हॉट्स अॅप डाऊनलोड केलं तर काय आनंदी आनंदच! मधे एकदा पुणे-मुंबई प्रवास सुरू झाल्यावर बाळ झोपलं आणि मी सरसावून सज्ज झाले. ध्येय एकच की, आता पटापट राहिलेले फोन आणि मेसेज! आधीपासूनच त्या दडपणाखाली गुदमरल्यासारखं झालं. श्वासाची लयसुद्धा बदलली. बोटं सराईतपणे फिरायला लागली. जरा वेळानी गाडी थांबल्यासारखी वाटली म्हणून डोकं वर काढलं तर चक्क खोपोलीचा पेट्रोल पंप आला होता! सूर्यास्त झाला होता केव्हाच. अंधार पडला होता.
मला इतकं खजिल झाल्यासारखं वाटलं. घाट पाहिला नाही, डोंगर नाही, दरी नाही, आकाश नाही, सूर्यास्त, पाणी, झाडं, शेतं, पक्षी, उगवती चंद्रकोर काहीही पाहिलं नाही. दीड-एक तास फक्त मोबाइलचा स्क्रीन, स्मायली, स्पेलींग, नंबर. एवढंच पहात होते मी. शप्पथ सांगते, त्या दिवशी मोबाइल फेकून द्यावा असं मनात आलं होतं. 'जिंदगी ना मिले दोबारा' या सिनेमात फरहान अख्तर कसा हृतिकचा फोन फेकून देतो. तसा हक्कानी रागवणारा कुणीतरी मित्र असायला हवा होता, असं वाटून रडूच आलं एकदम. किती भीषण, वेगवान जगतोय आपण. कातळावर पाझरणारं पाणी पाहून मऊ वाटणं. शिशिरातल्या पानगळीची आणि बदलत्या रंगांची जादू पाहून हरखून जाणं. सूर्यास्तानंतरच्या अंधाराकडे जाणाऱ्या आकाशाच्या रंगाला आरती प्रभू कुसुंबी रंग म्हणतात. त्या कुसुंबी छटा पाहत भान विसरून जाणं. हे सगळं किती आश्वासक वाटायचं. ते सगळं माझ्या हातून गेलं का? कधी गेलं? मी का जाऊ दिलं. असं मनाशी भांडेपर्यंत शहराची हद्द सुरू झाली.
डोळ्याला आल्हाद देणारा रस्ता संपला आणि एक महाकंटाळवाणी, मोनोटोनस वाहनांची रांग सुरू झाली. त्या ठप्पपणे आतल्या माणसांचेही तसेच नीरस पुतळे झाले होते. लहान मुलं अस्वस्थ झाली होती. मला वाटलं, हे सगळं मोबाइलच्या स्क्रीनसारखं यांत्रिक आहे. पण आपलं नातं मनातल्या कवितांशी आणि प्रतिमांशी आहे. भेसूर वाटणाऱ्या ट्रॅफिक जाम आणि रस्त्यात भांडणाऱ्या माणसांना पाहिलं की नकळत आपला स्क्रीन बदलतो. दऱ्याखोऱ्यांचा होतो. आपल्याला उभारी देतो. आणि आपण आजूबाजूचा कर्कश्यपणा तरून जातो.
ही माझी उलघाल, अपराधीपणा- बहुतेक माझ्या मित्राला- पुणे-मुंबई रस्त्याला मनोमन कळला. आणि त्यानी युक्ती करून माझा फोन गडप केला. मीच माझ्या गळ्याला आवळत आणलेला फास, सैल केला त्यानी. श्वासाला लयीत आणलं त्यानी. किती मस्त मोकळं वाटतंय मला गेले काही दिवस. हुर्रे! माझा फोन हरवला आहे! घरी बसल्या बसल्यासुद्धा. गुणगुणत, केसांना वाऱ्यावर उडू देत. उबदार उन्हाच्या एका रानातल्या वाटेवर निवांत फिरत असल्यासारखं वाटतंय मला. अगदी हलकं येस, आय अॅम हॅप्पी टू बी
लॉस्ट. .
-सोनाली कुलकर्णी
(हा लेख लोकसत्ताच्या सौजन्याने)
Sunday, January 20, 2013
`दनाई`चा लॅंडमा्र्क आता निघून चाललाय
मी नेहमीच तिथून जाते. त्यामुळे ओझरतं दर्शन नक्की ठरलेलं. काही काम असो किंवा नसो. बाय डीफॉल्ट उगीचच न्याहाळत जाण्याची सवय लागलेली. त्या दिवशी काहीतरी वेगळी हालचाल जाणवली तिथे- त्यामुळे उत्सुकता चाळवली गेली. आणि मी वाट वाकडी करून दारापर्यंत गेले. आतलं दृश्य पाहून कमालीचा धक्का बसला.
आणि बातमी ऐकून तरी सुन्न घेरीच आली. 'दनाई' बंद होणार म्हणे. खार-बांद्रा परिसरातलं सुप्रसिद्ध आणि फार जुनं पुस्तकाचं दुकान. दनाईत जास्त करून इंग्लिश पुस्तकंच असतात, पण पुस्तकाच्या दुकानात जायला मी काहीतरी कारणच शोधत असते. कधी कधी पुस्तकं नाही. तर काही मासिक वगैरे घ्यायला तरी मी आत डोकावयाचे- काउंटरच्या मागे जाड भिंगाचा चष्मा घातलेले, दक्षिणी अॅक्सेंट असलेले गृहस्थ नेहमी माझ्याशी हिंदी-मराठी चित्रपटांविषयी बोलायचे. कुठली डीव्हीडी घरी आणून पाहिली, त्यावरचं मत, आवर्जून सांगायचे.
माझ्या नव-यासाठी 'दनाई' म्हणजे श्रद्धास्थान! दर आठ-पंधरा दिवसांनी दनाईची चक्कर ठरलेली. मला गमतीनी कधी कधी वाटायचं, वाण्याकडे कसं महिन्याचं किराणा सामान मांडून ठेवतात, तसं दनाईमध्ये नचिकेतचं पुस्तकाचं बिल मांडून ठेवायला पाहिजे. तरीही चढाओढ असल्यासारखी इंग्रजी-मराठी पुस्तकं विकत घेतली जातात आमची. पण दनाईच्या शांत शिस्तशीर पद्धतीनं प्रिंटरवर बिल टाइप होईपर्यंत थांबायचं, परत एकदा वळून सगळ्या पुस्तकांकडे बघायचं. होत असलेल्या अजून एखाद्या मोहाशी तडजोड करायची आणि समाधानानी बाहेर पडायचं. हे ठरलेलं रूटीन. भर गर्दीच्या रस्त्यावर असूनही दनाईचा कोपरा फार पवित्र आणि निवांत वाटायचा. काही वर्षांपूर्वी शेजारी एक फास्ट फूड जॉइंट आलं, मग समोर सुपर बझिंग आणि स्टायलिश कॉफीशॉप आलं. पण दनाईची आब आणि रुबाब कधीच कमी झाले नाहीत. अक्षरश: देशविदेशातले वाचक तिथे यायचे. प्रत्येकाला वेगळीच पुस्तकं हवी असायची. काही मित्र-मैत्रिणी भान हरपून पुस्तकावर चर्चा करताना दिसायचे. तर कधी मतं न पटल्यामुळे वाद घालत बाहेर येताना दिसायचे.
मला नेहमी दनाईत जायचे डोहाळे लागलेले असायचे. त्या छोटय़ा दुकानात एक मोठ्ठं गोड तळघर पुस्तकांनी खचाखच भरलेलं. आणि एक बेतशीर वरचा मजला होता. अनेकदा बिल होईपर्यंत मी तिथल्या वेताच्या मोडय़ावर टेकायचे. तो मोडा कुणी तळघरात पळवला असेल, तर एका पायावरून दुसऱ्या पायावर भार टाकत ताटकळायला फार बरं वाटायचं. नवीन पुस्तकांवर नजर टाकत, नव्या पुस्तकांचा वास घेत तिथेच रेंगाळावंसं वाटायचं. अमुक एक पुस्तक हवं असेल, तर लगेच नाव नोंदवून घेतलं जायचं. नचिकेतला एकदा मुंबईच्या जुन्या इमारतींवरचं कुठलं पुस्तक हवं होतं- ते लगेच आणून दिलं त्यांनी. एखादं पुस्तक सांगितल्यावरही मिळालं नाही तर फार हताश व्हायची दनाई टीम. नाही हो. मिळतच नाहीए असं हरल्यासारखं सांगायचे.
मी त्या दिवशी गेले तर उरलीसुरली पुस्तकं पुठ्ठय़ाच्या मोठय़ा बॉक्समध्ये भरली जात होती. दुकानाच्या मालक- मिसेस मँगो, ते दक्षिणी गृहस्थ किंवा ओळखीचं कुणीच दिसत नव्हतं. सामान हलवणारे वेगळेच कामगार भराभरा काम करत होते. आपण कपडे भरतोय, भांडी. की पुस्तकं. काहीच फरक पडत नव्हता त्यांना. त्रयस्थपणे नीट पॅकिंग करण्यात गुंतले होते ते सगळे. आधी मला वाटलं दनाईचंच नूतनीकरण होणार असेल. पण चौकशीअंती समजलं. की क्लोज म्हणजे कायमचं शटर बंद होणार आहे आणि तिथे आता कोणा मोठ्ठय़ा डिझायनर की सराफाची शोरूम निघणार आहे. माझ्या गळ्यात तो त्रासदायक, दुखणारा आवंढा आला. आवाज चिरकायला लागला. शेवटचा लॉट घेऊन चाललेल्या तिथल्या माणसांना मी डोळ्यातलं पाणी आवरत. ''खरंच? असं कसं शक्य आहे.'' असं विचारायला लागले, पुस्तकाच्या गठ्ठय़ांना स्पर्श करायला लागले. आपल्याला सांगून कुणीतरी घर लुटून न्यावं- आपल्या डोळ्यासमोर आणि आपल्याला काही करता येऊ नये. तसं मूर्खासारखं रडू यायला लागलं.
किती जणांना मी हा पत्ता सांगितला होता. किती जणांनी मला सांगितला होता. दनाईच्या पुढे, दनाईच्या जवळ; दनाई माहिती आहे का. पुढे आल्यावर दनाई नावाचं पुस्तकाचं दुकान दिसेल. तिथून. छे! किती मित्र-मैत्रिणी या परिसरात राहतात. किती दुकानं आहेत, सिनेमाची ऑफिसं आहेत आसपास. जुन्या झाडांच्या गर्द सावलीत त्या सगळ्यांना दिशा सांगणारा एक अभ्यासू कोपरा आपल्याला अल्विदा म्हणतो आहे. आपलं खूप खूप नुकसान होतंय. न भरून येणारं. असं वाटायला लागलंय. त्या छोटय़ा दुकानात आपण आपल्याबरोबर थोडा वेळ राहायचो, शांत व्हायचो, आपण आपल्याला सापडायचो. `दनाई`च्या नुसत्या असण्याने त्या गजबजलेल्या संपूर्ण रस्त्यावर एक मोठ्ठा दिलासा नांदत होता. तो पत्ता, तो लॅण्डमार्क. निघून चालला आहे.
मागच्या आठवडय़ात फर्गसन कॉलेजचे माजी प्राचार्य- आमचे वि.म बाचल सर गेले. ते कळवायला माझ्या मराठीच्या माधवी वैद्य मॅडमचा एसएमएस आला. माहीत असलेली एक गोष्ट झाली. सर फार वर्ष आजारी होते. स्वत: एक चालती-बोलती इन्स्टिटय़ूट आणि प्रोत्साहनाचा झरा असलेले माझे बाचल सर गेले की.. परत न येण्यासाठी. आठवणी आहेत, पण असं काही घडलं की आपल्यातून आपलाच एक अंश संपतो नाही.. काही माणसं आणि पत्ते हरवण्यासाठीच आपल्याला शोधत येतात का?
नचिकेत, चित्रा पालेकर आणि शशिकांत सावंत तुमचं सांत्वन. 'दनाई'साठी...
- सोनाली कुलकर्णी
( हा लेख लोकसत्ताच्या सौजन्याने)
Saturday, January 12, 2013
जग कल्पनेच्या पलिकडले,,,
खिडकी उघडली की वीस-पंचवीस हरणं. तिथं
मला पहिल्यांदा कळलं की हरणं तशी मौनातच असतात. आवाज सळसळता फक्त त्यांच्या
हालचालींचा. समोरचं दार उघडलं की सुरेखसं अंगण, डौलात फिरणाऱ्या बदकांचा
जथ्था आणि उंचच उंच झाडं. प्रत्येक घरासमोर रेखीव रांगोळी.
रेणुकाताईंचा तर मोठा व्याप. निवृत्त झाल्या आहेत, पण तरीही उपयोगी पडावं म्हणून शाळेत ऑफ तासाला जातात, भाज्याचं डीपार्टमेंट सांभाळतात. त्यांच्या घराला कुलूप नसतं. त्या किंवा विलास मनोहर हक्कानी आपली वाट बघतात. माझं बाळ - कावेरी तर जन्मोजन्मीची ओळख असावी अशी झेपावून गेली त्यांच्याकडे. मग त्यांच्या कडेवर बसून प्राणी बघायचे, खेळ, गाणी, नाच, घास. बघायलाच नको. किती आपलं माणूस वाटतात काही जण.
सहज रंगलेल्या गप्पांमध्ये अचानक जाणवायचं- की बाबा आमटे नावाच्या एका विचारप्रवर्तक माणसाचे कुटुंबिय आहेत हे सगळे. त्यांचा सहवास मिळणं हा अलभ्य लाभच.
कावेरीच्या दृष्टिकोनातून पाहिलं. तर तिचं लहानपण किती सुंदर घडतंय. तिला प्रवास करायला मिळतोय, माणसं भेटतायत, निसर्ग भेटतोय. ती डॉ. मंदा आणि प्रकाश आमटेंच्या ओसरीत पहिल्यांदा रांगायला शिकली. जाता येता ते दोघं तिच्याशी बोलायचे. त्यांच्याकडची माकडं, खारी, गाढव, अस्वल, मगर, साप, वाघ, तरस, पोपट, साळींदर, कुत्री, मोर, गरुड, घुबड, हरीण असे प्राणी तिच्या स्वप्नात येतात. ती त्यांची आठवण काढत, आवाज काढत जागी होते. ते कुठे आहेत म्हणून मला विचारते.
अनिकेत-समीक्षाचा मुलगा निर्झर ऊर्फ निज्जूदादा कावेरीसाठी सख्ख्याहून जवळचा झाला आहे. त्याचं नाव घेतलं तरी तिचा चेहरा आनंदानी फुलून येतो. गेल्यावेळी मी म्हटलं ना. अॅक्टर असणं फार भाग्याचं. अनेक दुर्मिळ ऋणानुबंध वाटय़ाला येतात.
शूटींग सुरू झालं तेव्हा दडपण वाटलं. कारण 'लिव्हिंग लीजंड्स' फार कमी वेळा साकारायला मिळतात. इथे तर डॉ. प्रकाश आणि मंदावहिनींबरोबर रोज वावरायचो आम्ही. मला असं थेट ठरवून निरीक्षण करता येत नाही. ते ओघानं झालं तर जास्त नैसर्गिकपणे वठवता येतं. पण तो ओघ निरंतर राहणं- हे मात्र ज्याचं निरीक्षण करतोय त्याच्यावर अवलंबून असतं. मीडियाच्या मा-यासमोर भल्याभल्यांना टीव्हीवर चमकण्याचा मोह पडला आहे. त्यांची भंबेरी उडालेली आपण पाहिली आहे. पण या सिनेमाच्या ख-या हिरो-हिरॉईननी न्यू एजच्या वेडय़ा बाजारापासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवलं आहे. तेही अगदी सहजपणे. त्यात कडवटपणा नाही, ना अलिप्ततेचं धोरण. काम. हा एकच ध्यास आहे त्यांचा. ते सोबत असताना- त्यांच्यासारखं असण्याचा भास निर्माण करणं ही एक फार अप्रतिम, सुंदर आणि अत्यंत कठीण अशी परीक्षा होती आमची.
माझी माझी प्रोसेस चालू होती. त्याचबरोबर नाना पाटेकर नावाच्या माझ्या सहकलाकाराची तयारी, अभ्यास आणि परफॉरमन्स पाहून थक्क होत होते.
'प्रकाश आमटे'मध्ये ते इतके घुसले आहेत की, एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा. कधी दिगंतला सेटवर घेऊन यायचे, कधी अनघाला थांबवायचे. 'बरोबर आहे ना गं.. असंच करता ना तुम्ही.' असं वारंवार विचारायचे. वेळ मिळाला की प्रकाश आमटेंबरोबर हॉस्पिटल किंवा प्रकल्पाची चक्कर मारायचे. प्राण्यांशी खेळायचे. एका रात्री नानासरांचा मावसभाऊ अचानक गेल्याची बातमी आली. फार जवळचा होता तो त्यांचा. पण ना. सर मुंबईला गेले नाहीत. नुसतेच गप्प बसले. भेटायला गेलो तर स्वत:चा उदासपणा झाकत आम्हाला त्या भावाच्या आठवणी सांगायला लागले. आणि दुस-या दिवशी एका महत्त्वाच्या सीनमध्ये बघणारा घायाळ होईल इतके तुटत तुटत गेले.
मी गेल्या वेळी म्हटलं ना. त्यांना अभिनय येतच नाही. ते जगतात. कुठले संदर्भ कुठे जोडतात. सतत काहीतरी शोधत असतात. तरी हरवलेले वाटतात. तिरसट आहेत, आपल्याला या माणसाचा थांग लागत नाही असं वाटेपर्यंत घरच्यांची चौकशी करतात. कावेरीला बेदाणे खायला बोलावतात. तीही प्रकाश आमटेंच्या खारुताईसारखी न भीता त्यांच्याजवळ जाते. त्यांचं नाक ओढते. आजूबाजूला काही मोठी माणसं बसली आहेत, आपली काही चर्चा सुरू होती हे विसरून तिला भू भू दाखवायला नेतात. तासन् तास अर्णव, आहान, निज्जूशी खेळत बसायचे. मी नक्कीच त्यांच्याबरोबर घालवलेल्या दिवसांवर पुस्तक लिहू शकेन नाही म्हटलं तरी हॅट्ट्रिक झाली की आमची. टॅक्सी, देऊळ आणि आता प्रकाश आमटे.
हेमलकसाहून मी तिथले आदिवासी करतात तशी एक बाटली आणली आहे. एका निमुळत्या तोंडाच्या पारदर्शी बाटलीच्या आत सुंदर नक्षीकाम केलेली एक खाट आहे. ही पूर्ण पेचात टाकणारी बाब आहे की, ती आख्खी कॉट बाटलीच्या आत गेलीच कशी? काचेची बाटली तर नंतर बनवता येणार नाही. मग फक्त दोरी जाऊ शकेल अशा अरुंद भोकातून कुणी सुई कशी घातली असेल आणि कशी ती कॉट विणली असेल. आपल्या अपार कष्टांना कुणी इतकं सुंदर रूप कसं देत असेल? ती बाटली माझ्यासाठी आमटे परिवाराचं, हेमलकसाचं प्रतीक आहे. ते सगळेजण रोज संध्याकाळी संगमावर फिरायला जातात. कमी शब्दांच्या पण स्वर्गीय पाश्र्वसंगीत असलेल्या त्या काही अद्भुत संध्या मी बाटलीतल्या खाटेसारख्या खूप आत आत हृदयात जपून ठेवल्या आहेत
.
किती विलक्षण आहे तिथलं जगणं. साप निघतात, चावतात, चुकून मोहाची दारू प्यायल्यामुळे शुद्ध हरपलेले पेशंट येतात, तीन-तीन महिने चुकीचा- महागडा इलाज घेणाऱ्या माणसाला नि:शुल्क सल्ला दिला जातो. अस्वल बिथरतं. वर्गमित्रांशी भांडल्यामुळे घरी पळून जाताना मुलं सापडतात. टेकीला आलेल्या गरोदर बायका बाळंत झाल्यावर तासाभरात बाळ काखोटीला मारून जायला निघतात. कुणी क्रिटीकल असतात. कुणाचे हात-पाय मोडलेले असतात; कुणी प्राणी-पक्षी आणून देतात, तर कुणी मुलं. या सगळ्या सावळ्या गोंधळाला- पसारा न मानता, न चिडता आपलंसं करायचं. तोडगा काढायचा. त्याहीपेक्षा महाकठीण म्हणजे आभार न मानण्याला स्वाभाविक समजायचं. या आदिवासींच्या संस्कृतीत 'थँक्ययू' वगैरे संकल्पनाच नाहीत म्हणे. म्हणजे खराखरा थँकलेस जॉब करत राहायचं. अविरत. स्वत:चं व्रत म्हणून. छे! कल्पनेच्या पलिकडचं आहे हे.
हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडत होतं. दोनअडीच हजार पगाराची माणसं दर महिन्याला शंभर रुपये प्रकल्पासाठी बाजूला ठेवतात, कुणी लाख तर कुणी आपली इस्टेट. आपापल्याला ऐपतीनुसार माणसं सहभाग घ्यायचा प्रयत्न करत आहेत. ह्य़ा प्रकल्पाला अशी मोलाची मदत अगदी हवीच आहे. त्याचबरोबर शिक्षित डॉक्टर, स्वयंसेवक यांचीही नितांत गरज आहे. बोला, विलास मनोहरांसारखं कुणाला आयुष्य बदलायचं आहे?
- सोनाली कुलकर्णी
( हा लेख लोकसत्ता या दैनिकाच्या सौजन्याने)

Tuesday, January 8, 2013
तळापर्य़ंत पाझरलेला माणूस
डिसेंबर महिन्यातली सकाळ. नागपूरला विमानानी उतरल्यावर कारने आमचा
प्रवास सुरू झाला. सुरुवातीला अर्धा तास रस्ता फार चांगला होता. मग खड्डे,
खडी, धक्के, ब्रेक! आधी गाडीचा ड्रायव्हर अगदी फ्रेश आणि मज्जेत होता. गाणी
लावू का, एसी बरोबर आहे ना. इ. खातिरदारी करत होता. तीन तासांनंतर
चंद्रपूर आलं. तिथे जेवणासाठी थांबून मग पुढे निघालो. मात्र. ड्रायव्हर
साहेबांचा रागरंग काही ठीक दिसेना. ते मागच्या गाडीतल्या ड्रायव्हरला फोन
करायला लागले. रस्ता चुकले. अथक बडबडायला लागले. अत्यंत चुकीच्या माणसांना
अलापल्ली? मेटपल्ली? असे पुटपुटत विचारायला लागले. अर्ध्या-पाऊण तासाच्या
त्यांच्या अस्वस्थ वर्तनानंतर लक्षात आलं की, आधीच्या अहो मी इथलाच आहे. हा
रस्ता माझ्या पायाखालचा आहे. डोळे मिटूनही मी गाडी चालवू शकतो. इ. सगळ्या
थापा होत्या. त्यांना तसं म्हणायला सांगितलं गेलं होतं. जेणेकरून बिझनेस
हातातून जाऊ नये. आम्ही त्यांच्या थरकाप उडालेल्या हातांना शांत करण्यासाठी
जनरल गप्पा सुरू केल्या तेव्हा ते म्हणाले, 'मी फक्त ऐकून आहे, पण
तुम्हाला जायचंय त्या गावाला मी कध्धीच गेलो नाहीए. नक्षलवाद्यांचा परिसर
आहे तो.'
ते असं म्हणतायत तोपर्यंत आमच्या मोबाइलचं नेटवर्क गायब व्हायला लागलं. सूर्य कलायला लागला. घनदाट जंगल सुरू झालं. आजूबाजूला चिटपाखरू दिसेना. मैलाचे पाटय़ा दिसेनाशा झाल्या. पंधरा-पंधरा-वीस वीस मिनिटं समोरून दुसरं वाहनसुद्धा यायचं नाही. फारच तुरळक. एके ठिकाणी बरेच लाइट वगैरे दिसले म्हणून म्हटलं इथे रस्ता विचारावा. तर एव्हान ड्रायव्हर साहेबांची बोबडीच वळली होती.
मी काच खाली करू नये म्हणून त्यांनी वेग वाढवून पोबारा केला. आश्चर्यानी त्यांच्या घबराटीकडे पाहायला लागल्यावर ते म्हणाले- तो नक्षलवाद्यांचा कॅम्प असला तर? नक्षली साध्या वेषातपण असतात. त्यांनी गाडी अडवली तर? मला त्यांचा भित्रा आडमुठेपणा कळेना. आता थोडय़ा थोडय़ा वेळानी ते भामरागड येईल, भामरागड कुठे असं पुटपुटायला लागले. पूर्ण काळोख झाला. अगदी गर्द.
तेव्हा आम्हीही अस्वस्थ झालो. शंकेची पाल मनात चुकचुकायला लागली. की कधी येणार ते गाव? किती दूर आहे. काय हा रस्ता.! कधी संपणार प्रवास.! दर थोडय़ा वेळानी नदी यायची कुठलीतरी. कुठे शांत पाणी असायचं तर कुठे कोरडं-वाळूचं पात्र. अशा निर्जन जंगलात, अंधारात बाथरूमला थांबायची पण छाती होईना. कंटाळा, वैताग आणि साशंकतेचे छे! बापरे! किती लांब! असे उद्गार उमटायला लागले. इतका सारा वेळ सहकार्य करत असलेलं माझं बाळही कंटाळल्यासारखं झालं. आणि अचानक उजव्या हाताला ती पाटी दिसली- लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा !

गाडी आत आली आणि उतरल्यावर सगळ्यात आधी मला कोण भेटावं? मी ज्यांची भूमिका साकारणार होते- त्या डॉ. मंदा आमटे! पाठोपाठ डॉ. प्रकाश आणि त्यांचं कुटुंब भेटलं. सगळ्यांशी गप्पा झाल्या. त्यांच्या कामावर बनवलेली डॉक्युमेंटरी पाहिली. हळूहळू तिथला साधेपणा आणि शिस्त लक्षात यायला लागली.
दुस-या दिवशी सकाळी डॉक्टरांच्या बरोबर संपूर्ण प्रकल्पाची चक्कर मारली. त्यात त्यांचे शेपूट असलेले कुटुंबीयही भेटले. डॉक्टरांची, त्यांच्या नातवांची प्राण्यांबरोबर वावरतानाची सहजता अविश्वसनीय होती. माझ्या मनातल्या-डासांमुळे लहान मुलांना होणाऱ्या सेरेब्रल मलेरिया विषयीच्या शंका मी विचारून घेतल्या. त्यावर अति खरं आणि प्रांजळ उत्तर मिळालं. त्यात 'काही होणार नाही'चा खोटा आत्मविश्वास नव्हता आणि शहरातल्या पाहुण्यांना इम्प्रेस करायला कृत्रिम काळजीही नव्हती. आमचीही मुलं इथेच आहेत. ह्य़ा एका मधल्या वाक्यानं आमचं शांत निरसन झालं.
हेमलकसाचे दिवस श्वास घेण्याइतके सहज होते. डॉक्टर असणं किती भाग्याचं! इतर पर्यटकांप्रमाणे एक-दोन दिवस येऊन पाहणी करून परतावं नाही लागलं आम्हाला. आम्ही ठिय्या मारून राहू शकलो तिथे. आमटे कुटुंबीयांच्या दैनंदिनीत भाग घेऊ शकलो. ह्य़ा वास्तव्यात अनेक प्रसंग घडले. पण कुठलीच घटना शांती ढळवणारी ठरली नाही. त्यात रात्री-अपरात्री डॉक्टरांकडे धाव घेणारे स्थानिक पेशंट असोत की आमच्या शूटिंगच्या भलभलत्या अडचणी, सगळ्यावर आपसूक उपाय निघत गेले.
डॉ. प्रकाश आणि मंदा आमटेंच्या जगण्यात एक विलक्षण विश्वास आहे. तो स्वत:वर आहे, नात्यांवर आहे, निसर्गावर आहे.
माझ्या मनात आलं. हे दमत नसतील? रोज नवे पाहुणे येतात. त्यांना कामाबद्दल माहिती द्यायची. रोजच्या रोज पेशंट येतात- त्यांना तपासायचं, ऑपरेशनं करायची, रुग्णांना बरं करायचं, शेपूटवाल्या कुटुंबीयांची देखभाल, त्यांच्यासोबत वेळ घालवायचा, नेमानं फिरायला जायचं, पत्र्यव्यवहार, फोन. मेसमध्ये खाण्याच्या वेळा पाळायच्या. संपूर्ण प्रकल्पात एकी, निष्ठा आणि मैत्री जोपासायची. कबूल आहे आता दिगंत, अनघा, अनिकेत, समीक्षा हे सगळे ही काम वाटून घेतात. इतर सहकारीही आहेत.
पण १९७३ ला सुरू झालेल्या ह्य़ा प्रकल्पात, म्हणजे गेल्या ३९ वर्षांत- 'दमणे' ही संकल्पना मंदा-प्रकाश ह्य़ा दाम्पत्याच्या जवळ यायलाच धजलेली नाही. त्यांच्यात तळापर्यंत पाझरलेला दिसतो तो माणसांबद्दलचा नम्र कृतज्ञ भाव आणि प्रदर्शनाच्या घाईत नसलेली अपार आपुलकी.
कसं काय ठरवलं असेल त्यांनी 'हेमलकसा' नावाच्या नागपूरच्या पुढे आंध्र आणि मध्य प्रदेशालगत असलेल्या गडचिरोली भागात काम करणं? कुणाशी कमिटमेंट आहे त्यांची? गप्पांमध्ये वैचित्र्य, साहस, दु:ख, आव्हानांनी भरलेले किस्से हसत हसत सांगितले जातात. त्यात कुठेही अनंत अडचणी येऊनसुद्धा आम्ही कसे हटलो नाही.. अशा अहंकाराचा लवलेशही नाही. यंदा खूप थंडी आहे. असं म्हणावं इतक्या सहजतेनं साप पकडतात. आज ट्रॅफिक खूप जास्त होता असं म्हणावं इतक्या सहजतेने स्थलांतरित पक्ष्यांबद्दल बोलतात. नव्या मोबाइलची नावं आपण कशी मिरवू, तसे पक्ष्यांची किंवा पामुलगौतमी, इंद्रावती ह्य़ा नद्यांची नावं सांगतात. त्यांच्या मनात पेशंट आदिवासी आहे की नक्षलवादी आहे, गरीब आहे की म्हातारा आहे हा विचारही येत नाही. भेदभावाचा तर प्रश्नच नाही.
प्रत्येक माणूस त्यांच्यासाठी अमूल्य आहे. माणूस वाचवणं, शिक्षित करणे, स्वावलंबी करणं हे त्यांचं ध्येय आहे. रोज समाधानाचं आश्वस्त स्मित घेऊन झोपतात. आणि पहाटे, माणुसकीला दिलेल्या वचनाला स्मरून जबाबदारीनी उठतात. आणि नव्या आव्हानांना, समस्यांना, परिस्थितीला भिडतात. जिथे त्यांनी क्रांती घडवली आहे, पण अजून त्यांना खूप काही बदलायचं आहे.
एखादा माणूस शहराकडे पळून आला असता किंवा त्याच्या बायकोनं तरी ह्य़ा आजीवन चालणा-या जनजागरणातून माघार घेतली असती. सुख-सोयीचं निवांत आयुष्य निवडलं असतं. पण ते दोघं आणि त्यांचे सच्चे सहकारी खिंडीतच थांबले आहेत. झुंजत आहेत. त्यांच्या अशक्यप्राय वाटणाऱ्या मेहनतीतून ह्य़ा आख्ख्या परिसराचा कायापालट झाला आहे.
असं वाटतं की हे आकाशगंगेसारखं हे स्वप्न सत्यात कसं उतरलं? हे खरं आहे का? असं कुणी जगलं असेल का? असेल तर का? खूप आतून जगण्याबद्दलचा उत्साह उसळून आला आहे. परिसस्पर्श झाल्यासारखं वाटायला लागलंय. त्यांनी प्रेम केलेल्या, त्यांच्या सोबत असलेल्या प्राण्यांच्या इतकं सहज, स्वच्छ आणि निर्भय वाटायला लागलंय.

Subscribe to:
Posts (Atom)