Sunday, January 27, 2013
आय अॅम हॅप्पी टू बी लॉस्ट. .
एखादी गोष्ट हरवल्यावर तुम्हाला कधी आनंद झालाय? विचित्र वाटेल, पण मला झालाय. अगदी गेल्याच आठवडय़ात माझा मोबाईल फोन हरवला. हरवला म्हणजे त्याला एक कहाणी आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शूटिंगहून परतत असताना बाळासाठी म्हणून गाडी थांबवावी लागली. मी गडबडीनी खाली उतरले. तेंव्हाच बहुतेक पडला फोन. पडल्याचं सुद्धा नंतर बऱ्याच वेळानी लक्षात आलं माझ्या. कारण फोन 'सो.कुल' प्रोफाईलवर होता. म्हणजे फक्त व्हायब्रेटरवर. आधी वाटलं, गाडीतच कुठेतरी पडला असेल. पण शोधेपर्यंत पोचलो घरी मुंबईला. मग खात्री पटली- की नक्की पडला फोन. परत कुठे जाणार शोधायला? गेला बिचारा. १९९७ पासून बरेच हॅण्डसेट बदलले, पण हरवणारा हा पहिलाच!
झालं! सगळे कॉण्टॅक्ट नंबर, एसएमएस, आठवण म्हणून डीलीट न केलेले मेसेज. सगळं गेलं. पण फारच काव्यात्मक पद्धतीनं झालं हे सगळं.
पुणे-मुंबई रस्ता हा माझा अतिजवळचा मित्र. त्याच्यावरच कुठेतरी फोन पडावा. तोही इतक्या शिताफिनी. बरं, चूक किंवा निष्काळजीपणा माझा स्वत:चाच. तोही आयुष्यात पहिल्यांदाच. मग चिडायचं तरी कसं आणि कुणावर? त्या रात्री घरी पोचल्यावर हळहळ फार वाटली, पण सकाळी उठले तर अहो आश्चर्यम्! चक्क हुश्श वाटत होतं मला. त्रास देणाऱ्या फॅन लोकांचे निनावी मिस्ड कॉल पाहून वैतागणं, नवे एसएमएस पाहिल्यावर, अजून जुन्यांना उत्तर पाठवणं बाकी आहे, ओळखीच्या नंबरांना कॉल बॅक करायला पाहिजे- हे सगळं वाटून सकाळी सकाळी कावरंबावरं होतं- ओशाळल्यासारखं वाटणं पण टळलं. आणि लक्षात आलं, अरेच्या! नवीन सिम कार्ड, फोन घेईपर्यंत आपण कुणालाच शब्दश: 'आन्सरेबल' नसणार आहोत टुणकन् उडीच मारली मी आनंदानी.
गेले किती महिने मी विचार करतीए. की, इंटरनेट, मोबाइल फोन हे सोयीपेक्षा लोढणं झाले आहेत. नवनवीन 'स्मार्ट' फोन तर अक्षरश: मान वर करायला उसंत मिळू नये अशी व्यवस्था करतायत. काय काय डाऊनलोड करता येतं, प्रचार करता येतो, कनेक्टेड राहता येतं, कमेन्ट करता येतात. देवा! नवीनच गुलामी सुरू झाली आहे. फोन उचलला नाही, तरी कॉल रिटर्न करणं आलं, एसएमएस ला उत्तर पाठवणं तरी सभ्यता म्हणून अनिवार्य झालं, त्यात ब्लॅकबेरीच्या स्टेटसवरसुद्धा प्रतिक्रिया येतात. व्हॉट्स अॅप डाऊनलोड केलं तर काय आनंदी आनंदच! मधे एकदा पुणे-मुंबई प्रवास सुरू झाल्यावर बाळ झोपलं आणि मी सरसावून सज्ज झाले. ध्येय एकच की, आता पटापट राहिलेले फोन आणि मेसेज! आधीपासूनच त्या दडपणाखाली गुदमरल्यासारखं झालं. श्वासाची लयसुद्धा बदलली. बोटं सराईतपणे फिरायला लागली. जरा वेळानी गाडी थांबल्यासारखी वाटली म्हणून डोकं वर काढलं तर चक्क खोपोलीचा पेट्रोल पंप आला होता! सूर्यास्त झाला होता केव्हाच. अंधार पडला होता.
मला इतकं खजिल झाल्यासारखं वाटलं. घाट पाहिला नाही, डोंगर नाही, दरी नाही, आकाश नाही, सूर्यास्त, पाणी, झाडं, शेतं, पक्षी, उगवती चंद्रकोर काहीही पाहिलं नाही. दीड-एक तास फक्त मोबाइलचा स्क्रीन, स्मायली, स्पेलींग, नंबर. एवढंच पहात होते मी. शप्पथ सांगते, त्या दिवशी मोबाइल फेकून द्यावा असं मनात आलं होतं. 'जिंदगी ना मिले दोबारा' या सिनेमात फरहान अख्तर कसा हृतिकचा फोन फेकून देतो. तसा हक्कानी रागवणारा कुणीतरी मित्र असायला हवा होता, असं वाटून रडूच आलं एकदम. किती भीषण, वेगवान जगतोय आपण. कातळावर पाझरणारं पाणी पाहून मऊ वाटणं. शिशिरातल्या पानगळीची आणि बदलत्या रंगांची जादू पाहून हरखून जाणं. सूर्यास्तानंतरच्या अंधाराकडे जाणाऱ्या आकाशाच्या रंगाला आरती प्रभू कुसुंबी रंग म्हणतात. त्या कुसुंबी छटा पाहत भान विसरून जाणं. हे सगळं किती आश्वासक वाटायचं. ते सगळं माझ्या हातून गेलं का? कधी गेलं? मी का जाऊ दिलं. असं मनाशी भांडेपर्यंत शहराची हद्द सुरू झाली.
डोळ्याला आल्हाद देणारा रस्ता संपला आणि एक महाकंटाळवाणी, मोनोटोनस वाहनांची रांग सुरू झाली. त्या ठप्पपणे आतल्या माणसांचेही तसेच नीरस पुतळे झाले होते. लहान मुलं अस्वस्थ झाली होती. मला वाटलं, हे सगळं मोबाइलच्या स्क्रीनसारखं यांत्रिक आहे. पण आपलं नातं मनातल्या कवितांशी आणि प्रतिमांशी आहे. भेसूर वाटणाऱ्या ट्रॅफिक जाम आणि रस्त्यात भांडणाऱ्या माणसांना पाहिलं की नकळत आपला स्क्रीन बदलतो. दऱ्याखोऱ्यांचा होतो. आपल्याला उभारी देतो. आणि आपण आजूबाजूचा कर्कश्यपणा तरून जातो.
ही माझी उलघाल, अपराधीपणा- बहुतेक माझ्या मित्राला- पुणे-मुंबई रस्त्याला मनोमन कळला. आणि त्यानी युक्ती करून माझा फोन गडप केला. मीच माझ्या गळ्याला आवळत आणलेला फास, सैल केला त्यानी. श्वासाला लयीत आणलं त्यानी. किती मस्त मोकळं वाटतंय मला गेले काही दिवस. हुर्रे! माझा फोन हरवला आहे! घरी बसल्या बसल्यासुद्धा. गुणगुणत, केसांना वाऱ्यावर उडू देत. उबदार उन्हाच्या एका रानातल्या वाटेवर निवांत फिरत असल्यासारखं वाटतंय मला. अगदी हलकं येस, आय अॅम हॅप्पी टू बी
लॉस्ट. .
-सोनाली कुलकर्णी
(हा लेख लोकसत्ताच्या सौजन्याने)
Sunday, January 20, 2013
`दनाई`चा लॅंडमा्र्क आता निघून चाललाय
मी नेहमीच तिथून जाते. त्यामुळे ओझरतं दर्शन नक्की ठरलेलं. काही काम असो किंवा नसो. बाय डीफॉल्ट उगीचच न्याहाळत जाण्याची सवय लागलेली. त्या दिवशी काहीतरी वेगळी हालचाल जाणवली तिथे- त्यामुळे उत्सुकता चाळवली गेली. आणि मी वाट वाकडी करून दारापर्यंत गेले. आतलं दृश्य पाहून कमालीचा धक्का बसला.
आणि बातमी ऐकून तरी सुन्न घेरीच आली. 'दनाई' बंद होणार म्हणे. खार-बांद्रा परिसरातलं सुप्रसिद्ध आणि फार जुनं पुस्तकाचं दुकान. दनाईत जास्त करून इंग्लिश पुस्तकंच असतात, पण पुस्तकाच्या दुकानात जायला मी काहीतरी कारणच शोधत असते. कधी कधी पुस्तकं नाही. तर काही मासिक वगैरे घ्यायला तरी मी आत डोकावयाचे- काउंटरच्या मागे जाड भिंगाचा चष्मा घातलेले, दक्षिणी अॅक्सेंट असलेले गृहस्थ नेहमी माझ्याशी हिंदी-मराठी चित्रपटांविषयी बोलायचे. कुठली डीव्हीडी घरी आणून पाहिली, त्यावरचं मत, आवर्जून सांगायचे.
माझ्या नव-यासाठी 'दनाई' म्हणजे श्रद्धास्थान! दर आठ-पंधरा दिवसांनी दनाईची चक्कर ठरलेली. मला गमतीनी कधी कधी वाटायचं, वाण्याकडे कसं महिन्याचं किराणा सामान मांडून ठेवतात, तसं दनाईमध्ये नचिकेतचं पुस्तकाचं बिल मांडून ठेवायला पाहिजे. तरीही चढाओढ असल्यासारखी इंग्रजी-मराठी पुस्तकं विकत घेतली जातात आमची. पण दनाईच्या शांत शिस्तशीर पद्धतीनं प्रिंटरवर बिल टाइप होईपर्यंत थांबायचं, परत एकदा वळून सगळ्या पुस्तकांकडे बघायचं. होत असलेल्या अजून एखाद्या मोहाशी तडजोड करायची आणि समाधानानी बाहेर पडायचं. हे ठरलेलं रूटीन. भर गर्दीच्या रस्त्यावर असूनही दनाईचा कोपरा फार पवित्र आणि निवांत वाटायचा. काही वर्षांपूर्वी शेजारी एक फास्ट फूड जॉइंट आलं, मग समोर सुपर बझिंग आणि स्टायलिश कॉफीशॉप आलं. पण दनाईची आब आणि रुबाब कधीच कमी झाले नाहीत. अक्षरश: देशविदेशातले वाचक तिथे यायचे. प्रत्येकाला वेगळीच पुस्तकं हवी असायची. काही मित्र-मैत्रिणी भान हरपून पुस्तकावर चर्चा करताना दिसायचे. तर कधी मतं न पटल्यामुळे वाद घालत बाहेर येताना दिसायचे.
मला नेहमी दनाईत जायचे डोहाळे लागलेले असायचे. त्या छोटय़ा दुकानात एक मोठ्ठं गोड तळघर पुस्तकांनी खचाखच भरलेलं. आणि एक बेतशीर वरचा मजला होता. अनेकदा बिल होईपर्यंत मी तिथल्या वेताच्या मोडय़ावर टेकायचे. तो मोडा कुणी तळघरात पळवला असेल, तर एका पायावरून दुसऱ्या पायावर भार टाकत ताटकळायला फार बरं वाटायचं. नवीन पुस्तकांवर नजर टाकत, नव्या पुस्तकांचा वास घेत तिथेच रेंगाळावंसं वाटायचं. अमुक एक पुस्तक हवं असेल, तर लगेच नाव नोंदवून घेतलं जायचं. नचिकेतला एकदा मुंबईच्या जुन्या इमारतींवरचं कुठलं पुस्तक हवं होतं- ते लगेच आणून दिलं त्यांनी. एखादं पुस्तक सांगितल्यावरही मिळालं नाही तर फार हताश व्हायची दनाई टीम. नाही हो. मिळतच नाहीए असं हरल्यासारखं सांगायचे.
मी त्या दिवशी गेले तर उरलीसुरली पुस्तकं पुठ्ठय़ाच्या मोठय़ा बॉक्समध्ये भरली जात होती. दुकानाच्या मालक- मिसेस मँगो, ते दक्षिणी गृहस्थ किंवा ओळखीचं कुणीच दिसत नव्हतं. सामान हलवणारे वेगळेच कामगार भराभरा काम करत होते. आपण कपडे भरतोय, भांडी. की पुस्तकं. काहीच फरक पडत नव्हता त्यांना. त्रयस्थपणे नीट पॅकिंग करण्यात गुंतले होते ते सगळे. आधी मला वाटलं दनाईचंच नूतनीकरण होणार असेल. पण चौकशीअंती समजलं. की क्लोज म्हणजे कायमचं शटर बंद होणार आहे आणि तिथे आता कोणा मोठ्ठय़ा डिझायनर की सराफाची शोरूम निघणार आहे. माझ्या गळ्यात तो त्रासदायक, दुखणारा आवंढा आला. आवाज चिरकायला लागला. शेवटचा लॉट घेऊन चाललेल्या तिथल्या माणसांना मी डोळ्यातलं पाणी आवरत. ''खरंच? असं कसं शक्य आहे.'' असं विचारायला लागले, पुस्तकाच्या गठ्ठय़ांना स्पर्श करायला लागले. आपल्याला सांगून कुणीतरी घर लुटून न्यावं- आपल्या डोळ्यासमोर आणि आपल्याला काही करता येऊ नये. तसं मूर्खासारखं रडू यायला लागलं.
किती जणांना मी हा पत्ता सांगितला होता. किती जणांनी मला सांगितला होता. दनाईच्या पुढे, दनाईच्या जवळ; दनाई माहिती आहे का. पुढे आल्यावर दनाई नावाचं पुस्तकाचं दुकान दिसेल. तिथून. छे! किती मित्र-मैत्रिणी या परिसरात राहतात. किती दुकानं आहेत, सिनेमाची ऑफिसं आहेत आसपास. जुन्या झाडांच्या गर्द सावलीत त्या सगळ्यांना दिशा सांगणारा एक अभ्यासू कोपरा आपल्याला अल्विदा म्हणतो आहे. आपलं खूप खूप नुकसान होतंय. न भरून येणारं. असं वाटायला लागलंय. त्या छोटय़ा दुकानात आपण आपल्याबरोबर थोडा वेळ राहायचो, शांत व्हायचो, आपण आपल्याला सापडायचो. `दनाई`च्या नुसत्या असण्याने त्या गजबजलेल्या संपूर्ण रस्त्यावर एक मोठ्ठा दिलासा नांदत होता. तो पत्ता, तो लॅण्डमार्क. निघून चालला आहे.
मागच्या आठवडय़ात फर्गसन कॉलेजचे माजी प्राचार्य- आमचे वि.म बाचल सर गेले. ते कळवायला माझ्या मराठीच्या माधवी वैद्य मॅडमचा एसएमएस आला. माहीत असलेली एक गोष्ट झाली. सर फार वर्ष आजारी होते. स्वत: एक चालती-बोलती इन्स्टिटय़ूट आणि प्रोत्साहनाचा झरा असलेले माझे बाचल सर गेले की.. परत न येण्यासाठी. आठवणी आहेत, पण असं काही घडलं की आपल्यातून आपलाच एक अंश संपतो नाही.. काही माणसं आणि पत्ते हरवण्यासाठीच आपल्याला शोधत येतात का?
नचिकेत, चित्रा पालेकर आणि शशिकांत सावंत तुमचं सांत्वन. 'दनाई'साठी...
- सोनाली कुलकर्णी
( हा लेख लोकसत्ताच्या सौजन्याने)
Saturday, January 12, 2013
जग कल्पनेच्या पलिकडले,,,
खिडकी उघडली की वीस-पंचवीस हरणं. तिथं
मला पहिल्यांदा कळलं की हरणं तशी मौनातच असतात. आवाज सळसळता फक्त त्यांच्या
हालचालींचा. समोरचं दार उघडलं की सुरेखसं अंगण, डौलात फिरणाऱ्या बदकांचा
जथ्था आणि उंचच उंच झाडं. प्रत्येक घरासमोर रेखीव रांगोळी.
रेणुकाताईंचा तर मोठा व्याप. निवृत्त झाल्या आहेत, पण तरीही उपयोगी पडावं म्हणून शाळेत ऑफ तासाला जातात, भाज्याचं डीपार्टमेंट सांभाळतात. त्यांच्या घराला कुलूप नसतं. त्या किंवा विलास मनोहर हक्कानी आपली वाट बघतात. माझं बाळ - कावेरी तर जन्मोजन्मीची ओळख असावी अशी झेपावून गेली त्यांच्याकडे. मग त्यांच्या कडेवर बसून प्राणी बघायचे, खेळ, गाणी, नाच, घास. बघायलाच नको. किती आपलं माणूस वाटतात काही जण.
सहज रंगलेल्या गप्पांमध्ये अचानक जाणवायचं- की बाबा आमटे नावाच्या एका विचारप्रवर्तक माणसाचे कुटुंबिय आहेत हे सगळे. त्यांचा सहवास मिळणं हा अलभ्य लाभच.
कावेरीच्या दृष्टिकोनातून पाहिलं. तर तिचं लहानपण किती सुंदर घडतंय. तिला प्रवास करायला मिळतोय, माणसं भेटतायत, निसर्ग भेटतोय. ती डॉ. मंदा आणि प्रकाश आमटेंच्या ओसरीत पहिल्यांदा रांगायला शिकली. जाता येता ते दोघं तिच्याशी बोलायचे. त्यांच्याकडची माकडं, खारी, गाढव, अस्वल, मगर, साप, वाघ, तरस, पोपट, साळींदर, कुत्री, मोर, गरुड, घुबड, हरीण असे प्राणी तिच्या स्वप्नात येतात. ती त्यांची आठवण काढत, आवाज काढत जागी होते. ते कुठे आहेत म्हणून मला विचारते.
अनिकेत-समीक्षाचा मुलगा निर्झर ऊर्फ निज्जूदादा कावेरीसाठी सख्ख्याहून जवळचा झाला आहे. त्याचं नाव घेतलं तरी तिचा चेहरा आनंदानी फुलून येतो. गेल्यावेळी मी म्हटलं ना. अॅक्टर असणं फार भाग्याचं. अनेक दुर्मिळ ऋणानुबंध वाटय़ाला येतात.
शूटींग सुरू झालं तेव्हा दडपण वाटलं. कारण 'लिव्हिंग लीजंड्स' फार कमी वेळा साकारायला मिळतात. इथे तर डॉ. प्रकाश आणि मंदावहिनींबरोबर रोज वावरायचो आम्ही. मला असं थेट ठरवून निरीक्षण करता येत नाही. ते ओघानं झालं तर जास्त नैसर्गिकपणे वठवता येतं. पण तो ओघ निरंतर राहणं- हे मात्र ज्याचं निरीक्षण करतोय त्याच्यावर अवलंबून असतं. मीडियाच्या मा-यासमोर भल्याभल्यांना टीव्हीवर चमकण्याचा मोह पडला आहे. त्यांची भंबेरी उडालेली आपण पाहिली आहे. पण या सिनेमाच्या ख-या हिरो-हिरॉईननी न्यू एजच्या वेडय़ा बाजारापासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवलं आहे. तेही अगदी सहजपणे. त्यात कडवटपणा नाही, ना अलिप्ततेचं धोरण. काम. हा एकच ध्यास आहे त्यांचा. ते सोबत असताना- त्यांच्यासारखं असण्याचा भास निर्माण करणं ही एक फार अप्रतिम, सुंदर आणि अत्यंत कठीण अशी परीक्षा होती आमची.
माझी माझी प्रोसेस चालू होती. त्याचबरोबर नाना पाटेकर नावाच्या माझ्या सहकलाकाराची तयारी, अभ्यास आणि परफॉरमन्स पाहून थक्क होत होते.
'प्रकाश आमटे'मध्ये ते इतके घुसले आहेत की, एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा. कधी दिगंतला सेटवर घेऊन यायचे, कधी अनघाला थांबवायचे. 'बरोबर आहे ना गं.. असंच करता ना तुम्ही.' असं वारंवार विचारायचे. वेळ मिळाला की प्रकाश आमटेंबरोबर हॉस्पिटल किंवा प्रकल्पाची चक्कर मारायचे. प्राण्यांशी खेळायचे. एका रात्री नानासरांचा मावसभाऊ अचानक गेल्याची बातमी आली. फार जवळचा होता तो त्यांचा. पण ना. सर मुंबईला गेले नाहीत. नुसतेच गप्प बसले. भेटायला गेलो तर स्वत:चा उदासपणा झाकत आम्हाला त्या भावाच्या आठवणी सांगायला लागले. आणि दुस-या दिवशी एका महत्त्वाच्या सीनमध्ये बघणारा घायाळ होईल इतके तुटत तुटत गेले.
मी गेल्या वेळी म्हटलं ना. त्यांना अभिनय येतच नाही. ते जगतात. कुठले संदर्भ कुठे जोडतात. सतत काहीतरी शोधत असतात. तरी हरवलेले वाटतात. तिरसट आहेत, आपल्याला या माणसाचा थांग लागत नाही असं वाटेपर्यंत घरच्यांची चौकशी करतात. कावेरीला बेदाणे खायला बोलावतात. तीही प्रकाश आमटेंच्या खारुताईसारखी न भीता त्यांच्याजवळ जाते. त्यांचं नाक ओढते. आजूबाजूला काही मोठी माणसं बसली आहेत, आपली काही चर्चा सुरू होती हे विसरून तिला भू भू दाखवायला नेतात. तासन् तास अर्णव, आहान, निज्जूशी खेळत बसायचे. मी नक्कीच त्यांच्याबरोबर घालवलेल्या दिवसांवर पुस्तक लिहू शकेन नाही म्हटलं तरी हॅट्ट्रिक झाली की आमची. टॅक्सी, देऊळ आणि आता प्रकाश आमटे.
हेमलकसाहून मी तिथले आदिवासी करतात तशी एक बाटली आणली आहे. एका निमुळत्या तोंडाच्या पारदर्शी बाटलीच्या आत सुंदर नक्षीकाम केलेली एक खाट आहे. ही पूर्ण पेचात टाकणारी बाब आहे की, ती आख्खी कॉट बाटलीच्या आत गेलीच कशी? काचेची बाटली तर नंतर बनवता येणार नाही. मग फक्त दोरी जाऊ शकेल अशा अरुंद भोकातून कुणी सुई कशी घातली असेल आणि कशी ती कॉट विणली असेल. आपल्या अपार कष्टांना कुणी इतकं सुंदर रूप कसं देत असेल? ती बाटली माझ्यासाठी आमटे परिवाराचं, हेमलकसाचं प्रतीक आहे. ते सगळेजण रोज संध्याकाळी संगमावर फिरायला जातात. कमी शब्दांच्या पण स्वर्गीय पाश्र्वसंगीत असलेल्या त्या काही अद्भुत संध्या मी बाटलीतल्या खाटेसारख्या खूप आत आत हृदयात जपून ठेवल्या आहेत
.
किती विलक्षण आहे तिथलं जगणं. साप निघतात, चावतात, चुकून मोहाची दारू प्यायल्यामुळे शुद्ध हरपलेले पेशंट येतात, तीन-तीन महिने चुकीचा- महागडा इलाज घेणाऱ्या माणसाला नि:शुल्क सल्ला दिला जातो. अस्वल बिथरतं. वर्गमित्रांशी भांडल्यामुळे घरी पळून जाताना मुलं सापडतात. टेकीला आलेल्या गरोदर बायका बाळंत झाल्यावर तासाभरात बाळ काखोटीला मारून जायला निघतात. कुणी क्रिटीकल असतात. कुणाचे हात-पाय मोडलेले असतात; कुणी प्राणी-पक्षी आणून देतात, तर कुणी मुलं. या सगळ्या सावळ्या गोंधळाला- पसारा न मानता, न चिडता आपलंसं करायचं. तोडगा काढायचा. त्याहीपेक्षा महाकठीण म्हणजे आभार न मानण्याला स्वाभाविक समजायचं. या आदिवासींच्या संस्कृतीत 'थँक्ययू' वगैरे संकल्पनाच नाहीत म्हणे. म्हणजे खराखरा थँकलेस जॉब करत राहायचं. अविरत. स्वत:चं व्रत म्हणून. छे! कल्पनेच्या पलिकडचं आहे हे.
हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडत होतं. दोनअडीच हजार पगाराची माणसं दर महिन्याला शंभर रुपये प्रकल्पासाठी बाजूला ठेवतात, कुणी लाख तर कुणी आपली इस्टेट. आपापल्याला ऐपतीनुसार माणसं सहभाग घ्यायचा प्रयत्न करत आहेत. ह्य़ा प्रकल्पाला अशी मोलाची मदत अगदी हवीच आहे. त्याचबरोबर शिक्षित डॉक्टर, स्वयंसेवक यांचीही नितांत गरज आहे. बोला, विलास मनोहरांसारखं कुणाला आयुष्य बदलायचं आहे?
- सोनाली कुलकर्णी
( हा लेख लोकसत्ता या दैनिकाच्या सौजन्याने)

Tuesday, January 8, 2013
तळापर्य़ंत पाझरलेला माणूस
डिसेंबर महिन्यातली सकाळ. नागपूरला विमानानी उतरल्यावर कारने आमचा
प्रवास सुरू झाला. सुरुवातीला अर्धा तास रस्ता फार चांगला होता. मग खड्डे,
खडी, धक्के, ब्रेक! आधी गाडीचा ड्रायव्हर अगदी फ्रेश आणि मज्जेत होता. गाणी
लावू का, एसी बरोबर आहे ना. इ. खातिरदारी करत होता. तीन तासांनंतर
चंद्रपूर आलं. तिथे जेवणासाठी थांबून मग पुढे निघालो. मात्र. ड्रायव्हर
साहेबांचा रागरंग काही ठीक दिसेना. ते मागच्या गाडीतल्या ड्रायव्हरला फोन
करायला लागले. रस्ता चुकले. अथक बडबडायला लागले. अत्यंत चुकीच्या माणसांना
अलापल्ली? मेटपल्ली? असे पुटपुटत विचारायला लागले. अर्ध्या-पाऊण तासाच्या
त्यांच्या अस्वस्थ वर्तनानंतर लक्षात आलं की, आधीच्या अहो मी इथलाच आहे. हा
रस्ता माझ्या पायाखालचा आहे. डोळे मिटूनही मी गाडी चालवू शकतो. इ. सगळ्या
थापा होत्या. त्यांना तसं म्हणायला सांगितलं गेलं होतं. जेणेकरून बिझनेस
हातातून जाऊ नये. आम्ही त्यांच्या थरकाप उडालेल्या हातांना शांत करण्यासाठी
जनरल गप्पा सुरू केल्या तेव्हा ते म्हणाले, 'मी फक्त ऐकून आहे, पण
तुम्हाला जायचंय त्या गावाला मी कध्धीच गेलो नाहीए. नक्षलवाद्यांचा परिसर
आहे तो.'
ते असं म्हणतायत तोपर्यंत आमच्या मोबाइलचं नेटवर्क गायब व्हायला लागलं. सूर्य कलायला लागला. घनदाट जंगल सुरू झालं. आजूबाजूला चिटपाखरू दिसेना. मैलाचे पाटय़ा दिसेनाशा झाल्या. पंधरा-पंधरा-वीस वीस मिनिटं समोरून दुसरं वाहनसुद्धा यायचं नाही. फारच तुरळक. एके ठिकाणी बरेच लाइट वगैरे दिसले म्हणून म्हटलं इथे रस्ता विचारावा. तर एव्हान ड्रायव्हर साहेबांची बोबडीच वळली होती.
मी काच खाली करू नये म्हणून त्यांनी वेग वाढवून पोबारा केला. आश्चर्यानी त्यांच्या घबराटीकडे पाहायला लागल्यावर ते म्हणाले- तो नक्षलवाद्यांचा कॅम्प असला तर? नक्षली साध्या वेषातपण असतात. त्यांनी गाडी अडवली तर? मला त्यांचा भित्रा आडमुठेपणा कळेना. आता थोडय़ा थोडय़ा वेळानी ते भामरागड येईल, भामरागड कुठे असं पुटपुटायला लागले. पूर्ण काळोख झाला. अगदी गर्द.
तेव्हा आम्हीही अस्वस्थ झालो. शंकेची पाल मनात चुकचुकायला लागली. की कधी येणार ते गाव? किती दूर आहे. काय हा रस्ता.! कधी संपणार प्रवास.! दर थोडय़ा वेळानी नदी यायची कुठलीतरी. कुठे शांत पाणी असायचं तर कुठे कोरडं-वाळूचं पात्र. अशा निर्जन जंगलात, अंधारात बाथरूमला थांबायची पण छाती होईना. कंटाळा, वैताग आणि साशंकतेचे छे! बापरे! किती लांब! असे उद्गार उमटायला लागले. इतका सारा वेळ सहकार्य करत असलेलं माझं बाळही कंटाळल्यासारखं झालं. आणि अचानक उजव्या हाताला ती पाटी दिसली- लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा !

गाडी आत आली आणि उतरल्यावर सगळ्यात आधी मला कोण भेटावं? मी ज्यांची भूमिका साकारणार होते- त्या डॉ. मंदा आमटे! पाठोपाठ डॉ. प्रकाश आणि त्यांचं कुटुंब भेटलं. सगळ्यांशी गप्पा झाल्या. त्यांच्या कामावर बनवलेली डॉक्युमेंटरी पाहिली. हळूहळू तिथला साधेपणा आणि शिस्त लक्षात यायला लागली.
दुस-या दिवशी सकाळी डॉक्टरांच्या बरोबर संपूर्ण प्रकल्पाची चक्कर मारली. त्यात त्यांचे शेपूट असलेले कुटुंबीयही भेटले. डॉक्टरांची, त्यांच्या नातवांची प्राण्यांबरोबर वावरतानाची सहजता अविश्वसनीय होती. माझ्या मनातल्या-डासांमुळे लहान मुलांना होणाऱ्या सेरेब्रल मलेरिया विषयीच्या शंका मी विचारून घेतल्या. त्यावर अति खरं आणि प्रांजळ उत्तर मिळालं. त्यात 'काही होणार नाही'चा खोटा आत्मविश्वास नव्हता आणि शहरातल्या पाहुण्यांना इम्प्रेस करायला कृत्रिम काळजीही नव्हती. आमचीही मुलं इथेच आहेत. ह्य़ा एका मधल्या वाक्यानं आमचं शांत निरसन झालं.
हेमलकसाचे दिवस श्वास घेण्याइतके सहज होते. डॉक्टर असणं किती भाग्याचं! इतर पर्यटकांप्रमाणे एक-दोन दिवस येऊन पाहणी करून परतावं नाही लागलं आम्हाला. आम्ही ठिय्या मारून राहू शकलो तिथे. आमटे कुटुंबीयांच्या दैनंदिनीत भाग घेऊ शकलो. ह्य़ा वास्तव्यात अनेक प्रसंग घडले. पण कुठलीच घटना शांती ढळवणारी ठरली नाही. त्यात रात्री-अपरात्री डॉक्टरांकडे धाव घेणारे स्थानिक पेशंट असोत की आमच्या शूटिंगच्या भलभलत्या अडचणी, सगळ्यावर आपसूक उपाय निघत गेले.
डॉ. प्रकाश आणि मंदा आमटेंच्या जगण्यात एक विलक्षण विश्वास आहे. तो स्वत:वर आहे, नात्यांवर आहे, निसर्गावर आहे.
माझ्या मनात आलं. हे दमत नसतील? रोज नवे पाहुणे येतात. त्यांना कामाबद्दल माहिती द्यायची. रोजच्या रोज पेशंट येतात- त्यांना तपासायचं, ऑपरेशनं करायची, रुग्णांना बरं करायचं, शेपूटवाल्या कुटुंबीयांची देखभाल, त्यांच्यासोबत वेळ घालवायचा, नेमानं फिरायला जायचं, पत्र्यव्यवहार, फोन. मेसमध्ये खाण्याच्या वेळा पाळायच्या. संपूर्ण प्रकल्पात एकी, निष्ठा आणि मैत्री जोपासायची. कबूल आहे आता दिगंत, अनघा, अनिकेत, समीक्षा हे सगळे ही काम वाटून घेतात. इतर सहकारीही आहेत.
पण १९७३ ला सुरू झालेल्या ह्य़ा प्रकल्पात, म्हणजे गेल्या ३९ वर्षांत- 'दमणे' ही संकल्पना मंदा-प्रकाश ह्य़ा दाम्पत्याच्या जवळ यायलाच धजलेली नाही. त्यांच्यात तळापर्यंत पाझरलेला दिसतो तो माणसांबद्दलचा नम्र कृतज्ञ भाव आणि प्रदर्शनाच्या घाईत नसलेली अपार आपुलकी.
कसं काय ठरवलं असेल त्यांनी 'हेमलकसा' नावाच्या नागपूरच्या पुढे आंध्र आणि मध्य प्रदेशालगत असलेल्या गडचिरोली भागात काम करणं? कुणाशी कमिटमेंट आहे त्यांची? गप्पांमध्ये वैचित्र्य, साहस, दु:ख, आव्हानांनी भरलेले किस्से हसत हसत सांगितले जातात. त्यात कुठेही अनंत अडचणी येऊनसुद्धा आम्ही कसे हटलो नाही.. अशा अहंकाराचा लवलेशही नाही. यंदा खूप थंडी आहे. असं म्हणावं इतक्या सहजतेनं साप पकडतात. आज ट्रॅफिक खूप जास्त होता असं म्हणावं इतक्या सहजतेने स्थलांतरित पक्ष्यांबद्दल बोलतात. नव्या मोबाइलची नावं आपण कशी मिरवू, तसे पक्ष्यांची किंवा पामुलगौतमी, इंद्रावती ह्य़ा नद्यांची नावं सांगतात. त्यांच्या मनात पेशंट आदिवासी आहे की नक्षलवादी आहे, गरीब आहे की म्हातारा आहे हा विचारही येत नाही. भेदभावाचा तर प्रश्नच नाही.
प्रत्येक माणूस त्यांच्यासाठी अमूल्य आहे. माणूस वाचवणं, शिक्षित करणे, स्वावलंबी करणं हे त्यांचं ध्येय आहे. रोज समाधानाचं आश्वस्त स्मित घेऊन झोपतात. आणि पहाटे, माणुसकीला दिलेल्या वचनाला स्मरून जबाबदारीनी उठतात. आणि नव्या आव्हानांना, समस्यांना, परिस्थितीला भिडतात. जिथे त्यांनी क्रांती घडवली आहे, पण अजून त्यांना खूप काही बदलायचं आहे.
एखादा माणूस शहराकडे पळून आला असता किंवा त्याच्या बायकोनं तरी ह्य़ा आजीवन चालणा-या जनजागरणातून माघार घेतली असती. सुख-सोयीचं निवांत आयुष्य निवडलं असतं. पण ते दोघं आणि त्यांचे सच्चे सहकारी खिंडीतच थांबले आहेत. झुंजत आहेत. त्यांच्या अशक्यप्राय वाटणाऱ्या मेहनतीतून ह्य़ा आख्ख्या परिसराचा कायापालट झाला आहे.
असं वाटतं की हे आकाशगंगेसारखं हे स्वप्न सत्यात कसं उतरलं? हे खरं आहे का? असं कुणी जगलं असेल का? असेल तर का? खूप आतून जगण्याबद्दलचा उत्साह उसळून आला आहे. परिसस्पर्श झाल्यासारखं वाटायला लागलंय. त्यांनी प्रेम केलेल्या, त्यांच्या सोबत असलेल्या प्राण्यांच्या इतकं सहज, स्वच्छ आणि निर्भय वाटायला लागलंय.

Subscribe to:
Posts (Atom)