Sunday, January 27, 2013
आय अॅम हॅप्पी टू बी लॉस्ट. .
एखादी गोष्ट हरवल्यावर तुम्हाला कधी आनंद झालाय? विचित्र वाटेल, पण मला झालाय. अगदी गेल्याच आठवडय़ात माझा मोबाईल फोन हरवला. हरवला म्हणजे त्याला एक कहाणी आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शूटिंगहून परतत असताना बाळासाठी म्हणून गाडी थांबवावी लागली. मी गडबडीनी खाली उतरले. तेंव्हाच बहुतेक पडला फोन. पडल्याचं सुद्धा नंतर बऱ्याच वेळानी लक्षात आलं माझ्या. कारण फोन 'सो.कुल' प्रोफाईलवर होता. म्हणजे फक्त व्हायब्रेटरवर. आधी वाटलं, गाडीतच कुठेतरी पडला असेल. पण शोधेपर्यंत पोचलो घरी मुंबईला. मग खात्री पटली- की नक्की पडला फोन. परत कुठे जाणार शोधायला? गेला बिचारा. १९९७ पासून बरेच हॅण्डसेट बदलले, पण हरवणारा हा पहिलाच!
झालं! सगळे कॉण्टॅक्ट नंबर, एसएमएस, आठवण म्हणून डीलीट न केलेले मेसेज. सगळं गेलं. पण फारच काव्यात्मक पद्धतीनं झालं हे सगळं.
पुणे-मुंबई रस्ता हा माझा अतिजवळचा मित्र. त्याच्यावरच कुठेतरी फोन पडावा. तोही इतक्या शिताफिनी. बरं, चूक किंवा निष्काळजीपणा माझा स्वत:चाच. तोही आयुष्यात पहिल्यांदाच. मग चिडायचं तरी कसं आणि कुणावर? त्या रात्री घरी पोचल्यावर हळहळ फार वाटली, पण सकाळी उठले तर अहो आश्चर्यम्! चक्क हुश्श वाटत होतं मला. त्रास देणाऱ्या फॅन लोकांचे निनावी मिस्ड कॉल पाहून वैतागणं, नवे एसएमएस पाहिल्यावर, अजून जुन्यांना उत्तर पाठवणं बाकी आहे, ओळखीच्या नंबरांना कॉल बॅक करायला पाहिजे- हे सगळं वाटून सकाळी सकाळी कावरंबावरं होतं- ओशाळल्यासारखं वाटणं पण टळलं. आणि लक्षात आलं, अरेच्या! नवीन सिम कार्ड, फोन घेईपर्यंत आपण कुणालाच शब्दश: 'आन्सरेबल' नसणार आहोत टुणकन् उडीच मारली मी आनंदानी.
गेले किती महिने मी विचार करतीए. की, इंटरनेट, मोबाइल फोन हे सोयीपेक्षा लोढणं झाले आहेत. नवनवीन 'स्मार्ट' फोन तर अक्षरश: मान वर करायला उसंत मिळू नये अशी व्यवस्था करतायत. काय काय डाऊनलोड करता येतं, प्रचार करता येतो, कनेक्टेड राहता येतं, कमेन्ट करता येतात. देवा! नवीनच गुलामी सुरू झाली आहे. फोन उचलला नाही, तरी कॉल रिटर्न करणं आलं, एसएमएस ला उत्तर पाठवणं तरी सभ्यता म्हणून अनिवार्य झालं, त्यात ब्लॅकबेरीच्या स्टेटसवरसुद्धा प्रतिक्रिया येतात. व्हॉट्स अॅप डाऊनलोड केलं तर काय आनंदी आनंदच! मधे एकदा पुणे-मुंबई प्रवास सुरू झाल्यावर बाळ झोपलं आणि मी सरसावून सज्ज झाले. ध्येय एकच की, आता पटापट राहिलेले फोन आणि मेसेज! आधीपासूनच त्या दडपणाखाली गुदमरल्यासारखं झालं. श्वासाची लयसुद्धा बदलली. बोटं सराईतपणे फिरायला लागली. जरा वेळानी गाडी थांबल्यासारखी वाटली म्हणून डोकं वर काढलं तर चक्क खोपोलीचा पेट्रोल पंप आला होता! सूर्यास्त झाला होता केव्हाच. अंधार पडला होता.
मला इतकं खजिल झाल्यासारखं वाटलं. घाट पाहिला नाही, डोंगर नाही, दरी नाही, आकाश नाही, सूर्यास्त, पाणी, झाडं, शेतं, पक्षी, उगवती चंद्रकोर काहीही पाहिलं नाही. दीड-एक तास फक्त मोबाइलचा स्क्रीन, स्मायली, स्पेलींग, नंबर. एवढंच पहात होते मी. शप्पथ सांगते, त्या दिवशी मोबाइल फेकून द्यावा असं मनात आलं होतं. 'जिंदगी ना मिले दोबारा' या सिनेमात फरहान अख्तर कसा हृतिकचा फोन फेकून देतो. तसा हक्कानी रागवणारा कुणीतरी मित्र असायला हवा होता, असं वाटून रडूच आलं एकदम. किती भीषण, वेगवान जगतोय आपण. कातळावर पाझरणारं पाणी पाहून मऊ वाटणं. शिशिरातल्या पानगळीची आणि बदलत्या रंगांची जादू पाहून हरखून जाणं. सूर्यास्तानंतरच्या अंधाराकडे जाणाऱ्या आकाशाच्या रंगाला आरती प्रभू कुसुंबी रंग म्हणतात. त्या कुसुंबी छटा पाहत भान विसरून जाणं. हे सगळं किती आश्वासक वाटायचं. ते सगळं माझ्या हातून गेलं का? कधी गेलं? मी का जाऊ दिलं. असं मनाशी भांडेपर्यंत शहराची हद्द सुरू झाली.
डोळ्याला आल्हाद देणारा रस्ता संपला आणि एक महाकंटाळवाणी, मोनोटोनस वाहनांची रांग सुरू झाली. त्या ठप्पपणे आतल्या माणसांचेही तसेच नीरस पुतळे झाले होते. लहान मुलं अस्वस्थ झाली होती. मला वाटलं, हे सगळं मोबाइलच्या स्क्रीनसारखं यांत्रिक आहे. पण आपलं नातं मनातल्या कवितांशी आणि प्रतिमांशी आहे. भेसूर वाटणाऱ्या ट्रॅफिक जाम आणि रस्त्यात भांडणाऱ्या माणसांना पाहिलं की नकळत आपला स्क्रीन बदलतो. दऱ्याखोऱ्यांचा होतो. आपल्याला उभारी देतो. आणि आपण आजूबाजूचा कर्कश्यपणा तरून जातो.
ही माझी उलघाल, अपराधीपणा- बहुतेक माझ्या मित्राला- पुणे-मुंबई रस्त्याला मनोमन कळला. आणि त्यानी युक्ती करून माझा फोन गडप केला. मीच माझ्या गळ्याला आवळत आणलेला फास, सैल केला त्यानी. श्वासाला लयीत आणलं त्यानी. किती मस्त मोकळं वाटतंय मला गेले काही दिवस. हुर्रे! माझा फोन हरवला आहे! घरी बसल्या बसल्यासुद्धा. गुणगुणत, केसांना वाऱ्यावर उडू देत. उबदार उन्हाच्या एका रानातल्या वाटेवर निवांत फिरत असल्यासारखं वाटतंय मला. अगदी हलकं येस, आय अॅम हॅप्पी टू बी
लॉस्ट. .
-सोनाली कुलकर्णी
(हा लेख लोकसत्ताच्या सौजन्याने)
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment