Saturday, January 12, 2013

जग कल्पनेच्या पलिकडले,,,

खिडकी उघडली की वीस-पंचवीस हरणं. तिथं मला पहिल्यांदा कळलं की हरणं तशी मौनातच असतात. आवाज सळसळता फक्त त्यांच्या हालचालींचा. समोरचं दार उघडलं की सुरेखसं अंगण, डौलात फिरणाऱ्या बदकांचा जथ्था आणि उंचच उंच झाडं. प्रत्येक घरासमोर रेखीव रांगोळी.

 रेणुकाताईंचा तर मोठा व्याप. निवृत्त झाल्या आहेत, पण तरीही उपयोगी पडावं म्हणून शाळेत ऑफ तासाला जातात, भाज्याचं डीपार्टमेंट सांभाळतात. त्यांच्या घराला कुलूप नसतं. त्या किंवा विलास मनोहर हक्कानी आपली वाट बघतात. माझं बाळ - कावेरी तर जन्मोजन्मीची ओळख असावी अशी झेपावून गेली त्यांच्याकडे. मग त्यांच्या कडेवर बसून प्राणी बघायचे, खेळ, गाणी, नाच, घास. बघायलाच नको. किती आपलं माणूस वाटतात काही जण.

सहज रंगलेल्या गप्पांमध्ये अचानक जाणवायचं- की बाबा आमटे नावाच्या एका विचारप्रवर्तक माणसाचे कुटुंबिय आहेत हे सगळे. त्यांचा सहवास मिळणं हा अलभ्य लाभच.

कावेरीच्या दृष्टिकोनातून पाहिलं. तर तिचं लहानपण किती सुंदर घडतंय. तिला प्रवास करायला मिळतोय, माणसं भेटतायत, निसर्ग भेटतोय. ती डॉ. मंदा आणि प्रकाश आमटेंच्या ओसरीत पहिल्यांदा रांगायला शिकली. जाता येता ते दोघं तिच्याशी बोलायचे. त्यांच्याकडची माकडं, खारी, गाढव, अस्वल, मगर, साप, वाघ, तरस, पोपट, साळींदर, कुत्री, मोर, गरुड, घुबड, हरीण असे प्राणी तिच्या स्वप्नात येतात. ती त्यांची आठवण काढत, आवाज काढत जागी होते. ते कुठे आहेत म्हणून मला विचारते.

अनिकेत-समीक्षाचा मुलगा निर्झर ऊर्फ निज्जूदादा कावेरीसाठी सख्ख्याहून जवळचा झाला आहे. त्याचं नाव घेतलं तरी तिचा चेहरा आनंदानी फुलून येतो. गेल्यावेळी मी म्हटलं ना. अ‍ॅक्टर असणं फार भाग्याचं. अनेक दुर्मिळ ऋणानुबंध वाटय़ाला येतात.

शूटींग सुरू झालं तेव्हा दडपण वाटलं. कारण 'लिव्हिंग लीजंड्स' फार कमी वेळा साकारायला मिळतात. इथे तर डॉ. प्रकाश आणि मंदावहिनींबरोबर रोज वावरायचो आम्ही. मला असं थेट ठरवून निरीक्षण करता येत नाही. ते ओघानं झालं तर जास्त नैसर्गिकपणे वठवता येतं. पण तो ओघ निरंतर राहणं- हे मात्र ज्याचं निरीक्षण करतोय त्याच्यावर अवलंबून असतं. मीडियाच्या मा-यासमोर भल्याभल्यांना टीव्हीवर चमकण्याचा मोह पडला आहे. त्यांची भंबेरी उडालेली आपण पाहिली आहे. पण या सिनेमाच्या ख-या हिरो-हिरॉईननी न्यू एजच्या वेडय़ा बाजारापासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवलं आहे. तेही अगदी सहजपणे. त्यात कडवटपणा नाही, ना अलिप्ततेचं धोरण. काम. हा एकच ध्यास आहे त्यांचा. ते सोबत असताना- त्यांच्यासारखं असण्याचा भास निर्माण करणं ही एक फार अप्रतिम, सुंदर आणि अत्यंत कठीण अशी परीक्षा होती आमची.

माझी माझी प्रोसेस चालू होती.  त्याचबरोबर नाना पाटेकर नावाच्या माझ्या सहकलाकाराची तयारी, अभ्यास आणि परफॉरमन्स पाहून थक्क होत होते.

'प्रकाश आमटे'मध्ये ते इतके घुसले आहेत की, एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा. कधी दिगंतला सेटवर घेऊन यायचे, कधी अनघाला थांबवायचे. 'बरोबर आहे ना गं.. असंच करता ना तुम्ही.' असं वारंवार विचारायचे. वेळ मिळाला की प्रकाश आमटेंबरोबर हॉस्पिटल किंवा प्रकल्पाची चक्कर मारायचे. प्राण्यांशी खेळायचे. एका रात्री नानासरांचा मावसभाऊ अचानक गेल्याची बातमी आली. फार जवळचा होता तो त्यांचा. पण ना. सर मुंबईला गेले नाहीत. नुसतेच गप्प बसले. भेटायला गेलो तर स्वत:चा उदासपणा झाकत आम्हाला त्या भावाच्या आठवणी सांगायला लागले. आणि दुस-या दिवशी एका महत्त्वाच्या सीनमध्ये बघणारा घायाळ होईल इतके तुटत तुटत गेले.

मी गेल्या वेळी म्हटलं ना. त्यांना अभिनय येतच नाही. ते जगतात. कुठले संदर्भ कुठे जोडतात. सतत काहीतरी शोधत असतात. तरी हरवलेले वाटतात. तिरसट आहेत, आपल्याला या माणसाचा थांग लागत नाही असं वाटेपर्यंत घरच्यांची चौकशी करतात. कावेरीला बेदाणे खायला बोलावतात. तीही प्रकाश आमटेंच्या खारुताईसारखी न भीता त्यांच्याजवळ जाते. त्यांचं नाक ओढते. आजूबाजूला काही मोठी माणसं बसली आहेत, आपली काही चर्चा सुरू होती हे विसरून तिला भू भू दाखवायला नेतात. तासन् तास अर्णव, आहान, निज्जूशी खेळत बसायचे. मी नक्कीच त्यांच्याबरोबर घालवलेल्या दिवसांवर पुस्तक लिहू शकेन नाही म्हटलं तरी हॅट्ट्रिक झाली की आमची. टॅक्सी, देऊळ आणि आता प्रकाश आमटे.


हेमलकसाहून मी तिथले आदिवासी करतात तशी एक बाटली आणली आहे. एका निमुळत्या तोंडाच्या पारदर्शी बाटलीच्या आत सुंदर नक्षीकाम केलेली एक खाट आहे. ही पूर्ण पेचात टाकणारी बाब आहे की, ती आख्खी कॉट बाटलीच्या आत गेलीच कशी? काचेची बाटली तर नंतर बनवता येणार नाही. मग फक्त दोरी जाऊ शकेल अशा अरुंद भोकातून कुणी सुई कशी घातली असेल आणि कशी ती कॉट विणली असेल. आपल्या अपार कष्टांना कुणी इतकं सुंदर रूप कसं देत असेल? ती बाटली माझ्यासाठी आमटे परिवाराचं, हेमलकसाचं प्रतीक आहे. ते सगळेजण रोज संध्याकाळी संगमावर फिरायला जातात. कमी शब्दांच्या पण स्वर्गीय पाश्र्वसंगीत असलेल्या त्या काही अद्भुत संध्या मी बाटलीतल्या खाटेसारख्या खूप आत आत हृदयात जपून ठेवल्या आहेत

.
किती विलक्षण आहे तिथलं जगणं. साप निघतात, चावतात, चुकून मोहाची दारू प्यायल्यामुळे शुद्ध हरपलेले पेशंट येतात, तीन-तीन महिने चुकीचा- महागडा इलाज घेणाऱ्या माणसाला नि:शुल्क सल्ला दिला जातो. अस्वल बिथरतं. वर्गमित्रांशी भांडल्यामुळे घरी पळून जाताना मुलं सापडतात. टेकीला आलेल्या गरोदर बायका बाळंत झाल्यावर तासाभरात बाळ काखोटीला मारून जायला निघतात. कुणी क्रिटीकल असतात. कुणाचे हात-पाय मोडलेले असतात; कुणी प्राणी-पक्षी आणून देतात, तर कुणी मुलं. या सगळ्या सावळ्या गोंधळाला- पसारा न मानता, न चिडता आपलंसं करायचं. तोडगा काढायचा. त्याहीपेक्षा महाकठीण म्हणजे आभार न मानण्याला स्वाभाविक समजायचं. या आदिवासींच्या संस्कृतीत 'थँक्ययू' वगैरे संकल्पनाच नाहीत म्हणे. म्हणजे खराखरा थँकलेस जॉब करत राहायचं. अविरत. स्वत:चं व्रत म्हणून. छे! कल्पनेच्या पलिकडचं आहे हे.

हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडत होतं. दोनअडीच हजार पगाराची माणसं दर महिन्याला शंभर रुपये प्रकल्पासाठी बाजूला ठेवतात, कुणी लाख तर कुणी आपली इस्टेट. आपापल्याला ऐपतीनुसार माणसं सहभाग घ्यायचा प्रयत्न करत आहेत. ह्य़ा प्रकल्पाला अशी मोलाची मदत अगदी हवीच आहे. त्याचबरोबर शिक्षित डॉक्टर, स्वयंसेवक यांचीही नितांत गरज आहे. बोला, विलास मनोहरांसारखं कुणाला आयुष्य बदलायचं आहे?



- सोनाली कुलकर्णी
( हा लेख लोकसत्ता या दैनिकाच्या सौजन्याने)

No comments:

Post a Comment